शहीद दिनानिमित्त अलिबागमध्ये पदयात्रा; देशभक्तीचा जयघोष
रायगड, 25 मार्च (हिं.स.)। शहीद दिनाच्या निमित्ताने मेरा युवा भारत, युवा कार्यक्रम एवं खेळ मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने अलिबाग येथे देशभक्तीपर पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. या पदयात्रेत युवक-युवतींसह ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत देशप
शहीद दिनानिमित्त अलिबागमध्ये पदयात्रा; देशभक्तीचा जयघोष


रायगड, 25 मार्च (हिं.स.)। शहीद दिनाच्या निमित्ताने मेरा युवा भारत, युवा कार्यक्रम एवं खेळ मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने अलिबाग येथे देशभक्तीपर पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. या पदयात्रेत युवक-युवतींसह ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत देशप्रेमाचा संदेश दिला.

दरवर्षी २३ मार्च हा दिवस शहीद दिन म्हणून साजरा केला जातो. १९३१ साली याच दिवशी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या थोर क्रांतिकारकांना लाहोर जेलमध्ये ब्रिटिशांनी फाशी दिली होती. त्यांच्या बलिदानाची आठवण ठेवत आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

तरुणांमध्ये देशभक्तीची भावना जागृत व्हावी तसेच क्रांतिकारकांचा त्याग स्मरणात राहावा, या उद्देशाने या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. मेरा युवा भारत, रायगड-अलिबाग व प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच स्पर्धा विश्व अकॅडमी अलिबाग यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.

या कार्यक्रमासाठी अमित पुंडे, जिल्हा युवा अधिकारी, मेरा युवा भारत रायगड-अलिबाग यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी भारत सरकार तपस्वी गोंधळी यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा संपन्न झाली.

यावेळी “भारत माता की जय”, “शहीद जवान अमर रहे”, “वंदे मातरम” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. पदयात्रेत स्पर्धा विश्व अकॅडमीच्या संचालिका तसेच स्वयंसिद्धा संस्थेच्या अध्यक्षा सुचिता साळवी, अकॅडमीचे युवक-युवती आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande