
मुंबई, 25 मार्च (हिं.स.)। शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधानपरिषद सदस्य ॲड अनिल परब यांनी बुधवारी महाराष्ट्र सरकारने गेल्या पाच अधिवेशनांमध्ये स्थापन केलेल्या विशेष तपास पथकांच्या (SIT) स्थितीबाबत स्पष्ट भूमिका मांडावी आणि त्यावर सविस्तर श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणी केली.
विधान परिषदेत अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावरील चर्चेदरम्यान बोलताना आमदार ॲड अनिल परब यांनी मागील विविध अधिवेशनांमध्ये विरोधी पक्ष तसेच सत्ताधारी सदस्यांनी उपस्थित केलेल्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या SIT बाबत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा प्रश्न उपस्थित केला.
SIT स्थापन केल्या आहेत मात्र त्यांचे अहवाल कधी सादर होणार आणि जर ते अद्याप उपलब्ध नसतील, तर सरकारने या अधिवेशनासह मागील पाच अधिवेशनांमध्ये स्थापन झालेल्या सर्व SIT बाबत स्पष्ट आणि पारदर्शक पाऊल उचलत श्वेतपत्रिका काढावी. त्या श्वेतपत्रिकेमध्ये सर्व SIT ची माहिती, त्यांची सद्यस्थिती आणि आतापर्यंतचे ॲक्शन टेकन रिपोर्ट बाबत माहिती समाविष्ट असावी, अशी मागणी आमदार ॲड अनिल परब यांनी केली.
आमदार ॲड अनिल परब यांनी पुढे सांगितले की, जर सरकारला खरोखरच सत्य बाहेर आणायचे असेल आणि भ्रष्टाचाराला आळा घालायचा असेल तर त्यांनी ही मागणी मान्य करावी.
हे पाचवे अधिवेशन असून या काळात विरोधी पक्षासोबतच काही वेळा सत्ताधारी सदस्यांनीही अनेक मुद्दे उपस्थित केले. त्या मागण्यांच्या अनुषंगाने सरकारने विविध प्रकरणांमध्ये SIT स्थापन करण्याची घोषणा केली. मात्र, या SIT चं पुढे काय झालं, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे, असे आमदार ॲड अनिल परब यांनी विचारले.
आमदार ॲड अनिल परब यांनी निदर्शनास आणून दिले की, प्रत्येक SIT कडून ॲक्शन टेकन रिपोर्ट (ATR) अपेक्षित असतो, मात्र गेल्या पाच अधिवेशनांमध्ये एकाही SIT चा असा अहवाल सभागृहात सादर करण्यात आलेला नाही. म्हणूनच सरकारने आतापर्यंत किती SIT स्थापन केल्या, त्यांचे निष्कर्ष काय आहेत आणि त्यांच्या ॲक्शन टेकन रिपोर्टची स्थिती काय आहे, याची माहिती द्यावी, अशी आग्रही मागणी आमदार ॲड अनिल परब यांनी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर