महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी डिजिटल साक्षरता महत्त्वाची – आदिती तटकरे
मुंबई, 25 मार्च (हिं.स.)‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून अनेक महिलांनी बचतीतून लघुउद्योग सुरू केले आहेत. अशा अनेक महिलांना महिला विकास मंडळाच्या माध्यमातून दिले जाणारे प्रशिक्षण, अनुदान आणि भांडवल यामुळे महिलांना व्यवसाय उभारण्यास
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी डिजिटल साक्षरता महत्त्वाची – आदिती तटकरे


मुंबई, 25 मार्च (हिं.स.)‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून अनेक महिलांनी बचतीतून लघुउद्योग सुरू केले आहेत. अशा अनेक महिलांना महिला विकास मंडळाच्या माध्यमातून दिले जाणारे प्रशिक्षण, अनुदान आणि भांडवल यामुळे महिलांना व्यवसाय उभारण्यासाठी तसेच, उत्पादने बाजारपेठेत पोहोचविण्यासाठीही मोठा आधार मिळत आहे. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करताना त्यांना डिजिटल आर्थिक साक्षरतेचे प्रशिक्षण देणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले

महिला विकास मंडळाच्या सभागृहात लर्निंग लिंक्स फाउंडेशन आणि मास्टरकार्ड यांच्या सहकार्याने आयोजित भांडवल व अनुदान वितरण समारंभात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमात महिला उद्योजकांना धनादेश, शिवणयंत्र तसेच घरगुती चक्की व्यवसाय सुरू करण्यासाठी साहित्य देण्यात आले. यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळाचे रायगड जिल्ह्याचे जिल्हा समन्वय अधिकारी विजय ढोके, मास्टर कार्डचे उपाध्यक्ष हरीश बाबु एसएन, वरिष्ठ व्यवस्थापक सरत चंद्रन, लर्निंग लिंक फाउंडेशनचे ट्रस्टी ॲग्नी नाथन, वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक अपूर्वा शिंदे यांच्यासह विविध संस्था, माविम आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, ग्रामीण भागातील अनेक महिला ऑनलाईन व्यवहार करत असताना डिजिटल प्रक्रियेची पुरेशी माहिती नसल्याने त्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. त्यामुळे व्यवसाय सुरू करणाऱ्या महिलांना डिजिटल साक्षर करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

सिंधुदुर्ग, पुणे आणि रायगड जिल्ह्यांत सुरू असलेले हे कार्य राज्यभर विस्तारावे, जेणेकरून अधिकाधिक ग्रामीण महिलांना व्यवसायाच्या संधी मिळतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. महिला व बालविकास विभाग, महिला विकास मंडळ आणि सामाजिक संस्थांनी समन्वयाने काम करून हा लाभ अधिक महिलांपर्यंत पोहोचवावा, असेही त्या म्हणाल्या.

मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेतून मिळालेल्या रकमेची शिस्तबद्ध बचत करून अनेक महिलांनी स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारल्याची प्रेरणादायी उदाहरणे पुढे येत आहेत. पुण्यातील रिद्धी वाकणकर यांनी सुमारे सहा महिने रक्कम जमा करून सोप बेस, मुलतानी माती आणि डाळिंबाच्या सालीची पावडर यांसारखा कच्चा माल खरेदी केला. त्यातून त्यांनी घरगुती आयुर्वेदिक उत्पादनांचा व्यवसाय सुरू केला. आज त्या घरची जबाबदारी सांभाळत स्वतःचा लघुउद्योगही यशस्वीपणे चालवत आहेत. या व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या जोरावर त्या आपल्या मुलीचे शिक्षण पूर्ण करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, पुण्यातील भोसरी येथील स्नेहा कांबळे यांची कहाणीही तितकीच प्रेरणादायी आहे. ज्वेलरी बनवण्याची आवड आणि स्वतःचा उद्योग सुरू करण्याची इच्छा असूनही आर्थिक अडचणींमुळे त्यांना हे शक्य होत नव्हते. मात्र ‘लाडकी बहीण’ योजनेतून मिळणाऱ्या दरमहा दीड हजार रुपयांची बचत करून त्यांनी कच्चा माल खरेदी केला आणि हँडमेड ज्वेलरी तयार करण्यास सुरुवात केली. आज त्या विविध प्रदर्शनांमध्ये आपली उत्पादने विकत असून, हळूहळू त्यांचा व्यवसाय वाढत आहे. सध्या त्यांच्या कडे सुमारे ५० हजार रुपयांचा कच्चा माल असून प्रत्येक प्रदर्शनातून त्यांना ५ ते ७ हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर आयोजित वार्षिक ‘सशक्ती कॉन्क्लेव्ह २०२५-२६’ मध्ये महिला उद्योजकांच्या यशाचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमातून महिलांना व्यवसायासाठी प्रोत्साहन, वित्तीय सुविधा आणि विविध शासकीय विभागांशी समन्वय साधण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. ‘सशक्त महिला उद्योजकता कार्यक्रम हा पहिल्या आणि दुसऱ्या पिढीतील कमी उत्पन्न गटातील महिला उद्योजकांना आर्थिक साक्षरता, डिजिटल साधने आणि व्यवसाय नियोजन कौशल्य देण्यासाठी तयार करण्यात आलेला एक अनोखा उपक्रम आहे.

लर्निंग लिंक्स फाउंडेशनद्वारे राबविण्यात येणारा आणि मास्टरकार्डच्या सहकार्याने चालणारा हा कार्यक्रम २०२२ पासून महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये पोहोचला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande