
छत्रपती संभाजीनगर, 27 मार्च (हिं.स.) – मतदार यादी मॅपिंग व पडताळणीचे काम ३० मार्चपर्यंत पूर्ण करण्यासाठी बीएलओमार्फत मतदारांच्या घरी भेटी देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सुपरवायझरांना दिले.
जिल्हा नियोजन समिती सभागृहात सुपरवायझरांसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेला उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड तसेच तहसीलदार नीलेश अपार उपस्थित होते.
मतदार यादीतील नावांची पडताळणी, नवीन मतदारांचा समावेश तसेच स्थलांतरित मतदारांची नोंद घेऊन त्यांच्या संमतीने योग्य ठिकाणी नाव नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. बीएलओमार्फत सुरू असलेल्या कामाचा नियमित आढावा सुपरवायझरांनी घ्यावा, जेणेकरून निवडणूक आयोगाने दिलेल्या कालावधीत मॅपिंगचे काम पूर्ण होईल, असेही सांगण्यात आले.
मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले की, मतदार यादी पुनरक्षण कार्यक्रमांतर्गत ९० टक्के मॅपिंगचे उद्दिष्ट ३० मार्चपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी बीएलओ आणि सुपरवायझरांना इतर कामांमधून कार्यमुक्त करण्यात आले असून शासकीय सुट्ट्यांमध्येही हे काम प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रत्येक एक हजार मतदारसंख्येच्या मतदान केंद्रासाठी एक बीएलओ आणि दहा बीएलओंसाठी एक सुपरवायझर नेमण्यात आला आहे. मॅपिंगदरम्यान मतदारांच्या घरी जाऊन आवश्यक अर्ज भरून घेणे, २००२ सालच्या मतदार यादीशी माहितीची पडताळणी करणे, तसेच नवीन मतदारांचा समावेश आणि स्थलांतरित मतदारांची माहिती तपासणे आवश्यक असल्याचे निर्देश देण्यात आले.
१८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांची नोंद त्यांच्या कुटुंबीयांच्या माहितीनुसार यादीत समाविष्ट करण्यावरही भर देण्यात आला. जिल्ह्यातील मतदार यादी मॅपिंगचे काम प्राधान्याने पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी स्वामी यांनी यावेळी केले.
--------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis