तहसील कार्यालयात लाचेची मागणी; एसीबीकडून आरोपीला बेड्या
लातूर, 27 मार्च (हिं.स.)। तहसील कार्यालय जळकोट येथे प्रतिबंधक कारवाईची फाईल बंद करण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी खाजगी इसमाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, लातूर येथे २३ वर्षीय त
लाचलुचपत


लातूर, 27 मार्च (हिं.स.)।

तहसील कार्यालय जळकोट येथे प्रतिबंधक कारवाईची फाईल बंद करण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी खाजगी इसमाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, लातूर येथे २३ वर्षीय तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार, जळकोट पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यावरून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १२६ अन्वये त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई सुरू होती. संबंधित प्रकरण तालुका दंडाधिकारी, जळकोट यांच्याकडे प्रलंबित असून, त्यासाठी तक्रारदारास वारंवार तहसील कार्यालयात जावे लागत होते.

दरम्यान, १३ मार्च २०२६ रोजी तहसील कार्यालयात गेलेल्या तक्रारदाराकडे अजय लद्दे (रा. जळकोट) याने फाईल बंद करून पुढील तारखांना उपस्थित राहण्याची गरज भासणार नाही, असे सांगत ₹२,००० लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने २४ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.

तक्रारीची पडताळणी करताना आरोपीने संबंधित लोकसेवकावर प्रभाव टाकून मदत करण्याचे आश्वासन देत ₹२,००० ऐवजी ₹१,००० स्वीकारण्यास तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सापळा रचण्यात आला; मात्र तक्रारदारावर संशय आल्याने आरोपीने लाच रक्कम स्वीकारली नाही. त्यामुळे सापळा कारवाई स्थगित करण्यात आली.

तथापि, पडताळणीत लाच मागणी सिद्ध झाल्याने जळकोट पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७३/२०२६ अंतर्गत भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७-अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अजय लद्दे याला २७ मार्च रोजी अटक करण्यात आली.

या कारवाईचे सापळा अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक संतोष धनसिंग बर्गे यांनी काम पाहिले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक जगदीश राऊत करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande