
अमरावती, 27 मार्च (हिं.स.)।
शहरात भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि त्यातून घडणाऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महापौर श्रीचंद तेजवणी यांनी तातडीची बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना ठोस उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले. युवा स्वाभिमान पार्टीच्या नगरसेविका अँड. प्रीती हर्षल रेवणे यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेत ही बैठक आयोजित करण्यात आली.बैठकीला मनपा अधिकारी डॉ. सचिन बोंद्रे, तसेच युवा स्वाभिमान पार्टीचे नगरसेवक, गटनेते नाना आमले व प्रदीप हिवसे उपस्थित होते. शहरात कुत्र्यांच्या चाव्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. विशेषतः लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण असल्याची चर्चा बैठकीत करण्यात आली.यावेळी भटक्या कुत्र्यांची नसबंदी, लसीकरण, शेल्टर होम उभारणी, जनजागृती मोहिमा आणि संबंधित सामाजिक संस्थांच्या कामाची तपासणी या मुद्द्यांवर भर देण्यात आला. डॉ. बोंद्रे यांनी विभागाकडे कर्मचाऱ्यांची व साधनसामग्रीची मर्यादा असल्याची माहिती दिली.नागरिकांसाठी हेल्पलाइन सुरू करणे, जनजागृती वाढवणे तसेच कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांना नुकसानभरपाईची तरतूद करण्याची मागणी नगरसेवकांनी केली. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने प्रत्यक्ष उपाययोजना राबविण्याची गरज असल्याचेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी