नाशिक - जिल्ह्यात शंभरहून अधिक पेट्रोलपंप कोरडेठाक
पुरवठ्यानंतरच मिळणार इंधन; सकाळपासूनच ग्राहकांच्या मोठ्या रांगा नाशिक, 27 मार्च (हिं.स.) जिल्ह्यात इंधन सुरळीत असल्याचा दावा जिल्हा प्रशासन करत असले तरी प्रत्यक्षात मात्र वेगळे चित्र दिसून आले. जिल्ह्यातील ५९० पैकी सुमारे १०० पेट्रोल पंप दुपारनंतर
नाशिक - जिल्ह्यात शंभरहून अधिक पेट्रोलपंप कोरडेठाक


पुरवठ्यानंतरच मिळणार इंधन; सकाळपासूनच ग्राहकांच्या मोठ्या रांगा

नाशिक, 27 मार्च (हिं.स.) जिल्ह्यात इंधन सुरळीत असल्याचा दावा जिल्हा प्रशासन करत असले तरी प्रत्यक्षात मात्र वेगळे चित्र दिसून आले. जिल्ह्यातील ५९० पैकी सुमारे १०० पेट्रोल पंप दुपारनंतर कोरडेठाक झाल्याचे समोर आले. इंधनाचे टँकर पेट्रोल पंपावर पोहोचल्यानंतरच ग्राहकांना इंधन मिळणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसभरात नाशिकमध्ये १४ टँकर दाखल झाल्याची माहिती मिळते. परंतु ती साठा काही तासातच समाप्त झाला. सुरू असलेल्या पेट्रोल पंपांवर सकाळपासूनच ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

गेल्या ३ ते ४ दिवसांपासून समाजमाध्यमांवर इंधन टंचाईबाबतचे संदेश व्हायरल झाल्यानंतर पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी दिसून आली. ग्राहकांनी मर्यादेपेक्षा जास्त इंधन साठवून ठेवल्याने टंचाई अधिकच तीव्र झाल्याचे चित्र आहे. गेल्या दोन दिवसांपासून सकाळपासून रात्री उशिरापर्यंत ग्राहकांच्या मोठ्या रांगा जिल्ह्यात दिसून येत आहेत. जिल्ह्यातील ५९० पैकी शंभरहून अधिक पेट्रोल पंपांवर दुपारनंतर इंधन संपले होते. जरी दिवसभरात १४ टँकर नाशिकमध्ये दाखल झाले, तरी पुरवठ्यापेक्षा मागणी जास्त असल्याने अनेक पेट्रोल पंपांवर ग्राहकांच्या रांगा उशिरापर्यंत कायम होत्या. याबाबत प्रशासनाकडून अतिरिक्त पेट्रोल घेऊ नये असे आवाहन करण्यात येत असले तरी ग्राहक ऐकण्याच्या मन स्थितीत नाहीत. त्यामुळे काही पेट्रोल पंपांनी दुचाकी चालकांना तीनशे रुपये तर चार चाकी चालकांना एक हजार रुपये पर्यंतच पेट्रोल विक्री केल्याचे निदर्शनास आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande