
छत्रपती संभाजीनगर, 27 मार्च (हिं.स.) : कामकाजातील तणाव कमी करण्यासाठी क्रीडा आणि कलागुणांची जोपासना आवश्यक असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केले. महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
विभागीय क्रीडा संकुल येथे महसूल विभागाच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे, अपर आयुक्त रिता मैत्रेवार, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी (सामान्य) संगिता राठोड, संगिता सानप, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड, संतोष गोरड, अरुण जऱ्हाड, नीलम बाफना यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले की, दैनंदिन जीवनात खिलाडूवृत्ती महत्त्वाची असून अशा स्पर्धांमुळे सकारात्मक वातावरण निर्माण होते. क्रीडा आणि सांस्कृतिक गुणांचा विकास जीवनात आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
विभागीय आयुक्त पापळकर यांनी खेळातून व्यक्तिमत्व विकास साधण्याचे महत्त्व अधोरेखित केले. छत्रपती संभाजीनगर विभागाने राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये यश मिळवावे, या उद्देशाने खेळाडूंनी जिद्दीने सहभाग घ्यावा, असे त्यांनी सांगितले. तणावमुक्त जीवनासाठी नियमित सराव आणि खेळ आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी केले. या स्पर्धांमधील विजेते खेळाडू आणि संघांना विभागीय क्रीडा स्पर्धांसाठी पाठविण्यात येणार असून या स्पर्धा परभणी येथे 3 ते 5 एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आल्या आहेत.
--------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis