संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ‘वनराणी’ टॉय ट्रेन पुन्हा बंद; पर्यटकांमध्ये नाराजी
मुंबई, 27 मार्च (हिं.स.)। मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे पर्यटकांसाठी आकर्षण ठरलेली ‘वनराणी’ मिनी टॉय ट्रेन पुन्हा एकदा बंद करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वीच गुजरातमधील अहमदाबाद येथून आणण्यात आलेली ही नवीन हिरव्या रंगाची ट्रेन तांत्र
Vanrani Toy Train


मुंबई, 27 मार्च (हिं.स.)। मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे पर्यटकांसाठी आकर्षण ठरलेली ‘वनराणी’ मिनी टॉय ट्रेन पुन्हा एकदा बंद करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वीच गुजरातमधील अहमदाबाद येथून आणण्यात आलेली ही नवीन हिरव्या रंगाची ट्रेन तांत्रिक बिघाडामुळे ठप्प झाल्याने पर्यटकांमध्ये प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त होत आहे.

उद्यान प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ‘वनराणी’ टॉय ट्रेनच्या इंजिनमध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाल्यामुळे मागील तीन दिवसांपासून ही सेवा तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहे. विशेषतः लहान मुलांसाठी आणि कुटुंबांसाठी आकर्षण असलेली ही सफर अचानक बंद झाल्यामुळे दूरदूरहून आलेल्या पर्यटकांना निराश होऊन परत जावे लागत आहे. त्यामुळे उद्यानातील व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

ही ट्रेन गुजरातमधील अहमदाबाद येथून मागवण्यात आली होती. मात्र नव्याने सुरू केलेली ट्रेन अल्पावधीतच बंद पडल्याने ट्रेन तयार करणाऱ्या कंपनीच्या कामाच्या गुणवत्तेबाबतही शंका निर्माण होत आहे. पर्यटकांनी सोशल मीडियावरही आपली नाराजी व्यक्त करत लवकरात लवकर सेवा सुरू करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, यापूर्वी मे 2021 मध्ये तौक्ते चक्रीवादळ मुळे ‘वनराणी’ सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर दीर्घ प्रतीक्षेनंतर 6 जानेवारी 2026 पासून ही ट्रेन पुन्हा सुरू करण्यात आली होती. पुढे 14 मार्च रोजी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते या सेवेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले होते.

उद्यान प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या तांत्रिक बिघाड दूर करण्याचे काम सुरू असून लवकरच ‘वनराणी’ टॉय ट्रेन सेवा पुन्हा सुरू केली जाईल, असा दावा करण्यात आला आहे. मात्र वारंवार सेवा खंडित होत असल्याने पर्यटकांचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande