
रत्नागिरी, 28 मार्च, (हिं. स.) : राजवाडी (ता. संगमेश्वर) येथील ब्राह्मणवाडीतील राधाकृष्ण मंदिर परिसरात ‘शेतकरी सहाय्यता’ कार्यक्रमातून ४४ शेतकऱ्यांना तांदळाचे वाटप करण्यात आले.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सुमारे अडीच टन तांदूळ देण्याक आला. राजवाडी, चिखली आणि धामणी या गावांमध्ये कार्यरत असलेल्या ‘पीपल्स एम्पॉवरिंग मुव्हमेंट’ या संस्थेच्या पुढाकारातून काही वर्षांपूर्वी स्थानिक शेतकरी गट स्थापन करण्यात आले होते. या गटांना बारमाही सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र मागील खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्याच पार्श्वभूमीवर पुणे येथील ‘बॉंसुरी फाउंडेशन-ॲलिकॉन कॅस्टलॉय’ आणि ‘पीपल्स एम्पॉवरिंग मुव्हमेंट’ यांच्या संयुक्त विद्यमाने एकूण ४४ शेतकऱ्यांना प्रत्येकी ६० किलो तांदूळ वाटप करण्यात आले.
यावेळी तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे यांनी शेतकरी गटांचे रजिस्ट्रेशन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. शेतकऱ्यांना बियाणे वेळेत उपलब्ध व्हावे यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी सांगितले. जलकुंड, मत्स्यव्यवसाय, काळीमिरी लागवड, शेतकरी पुरस्कार योजना आणि सामूहिक शेती योजनांबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. “राजवाडी गाव भविष्यात बांबू लागवडीसाठी ओळखले जावे,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांनी जंगली प्राण्यांमुळे होणारे नुकसान, त्यावरील उपाययोजना, विविध कृषी योजना, आवश्यक कागदपत्रे आणि शेतीतील अडचणी याबाबत आपल्या समस्या मांडल्या. त्यावर कृषी अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.
पेम संस्थेचे सतीश कामत यांनी कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करून शेतीतील समस्यांवर उपाययोजना, तसेच बांबू व साग लागवडीचे महत्त्व विशद केले. “बांबू आणि सागाची लागवड ही शेतकऱ्यांसाठी एक प्रकारचे ‘एटीएम’ ठरू शकते. शेतकरी कुटुंबांनी स्वावलंबी व्हावे,” असे त्यांनी सांगितले.
प्रकाश खांबे,संतोष भडवळकर सुहास लिंगायत, प्रकाश राजने, बारकू धनावडे, कृषी सहायक मिलिंद आंबेकर, मालवणकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी