
नाशिक, 28 मार्च (हिं.स.)।
- नाशिक-पुणे महामार्गावर उपनगर परिसरात भरधाव आणि निष्काळजीपणे चालविलेल्या कारने उभ्या दुचाकी व तिघांना दिलेल्या भीषण धडकेत एका अविवाहित तरुणीचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. या अपघातात चार ते पाच दुचाकींचे मोठे नुकसान झाले असून उपनगर पोलिस ठाण्यात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत तरुणीचे नाव शितल काशिनाथ खरोटे (वय २८, रा. अविनाश पार्क रो हाऊस, श्रीकृष्ण नगर, पंचक जेलरोड) असे आहे. शितल ही आपल्या परिचित सनी राम पुरी व त्याचा चुलत भाऊ रवींद्र अरुण पुरी (रा. पाथर्डी फाटा) यांच्यासोबत उपनगर येथील झेवियर्स चर्चशेजारील 'खुशी होंडा' शोरूममध्ये वाहन खरेदीसाठी आली होती.
गाडीची माहिती घेतल्यानंतर तिघे शोरूमच्या बाहेर येत असताना नाशिक रोडकडून सिडकोकडे जाणाऱ्या एम एच १५ डी एस १३०४ क्रमांकाच्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. ही कार सेवानिवृत्त शिक्षक ज्ञानदेव मोतीराम सोनवणे (वय ५९, रा. खोडेनगर) चालवत होते.
पत्नीसमवेत दशक्रिया विधी आटोपून परतत असताना त्यांनी भरधाव वेगात व निष्काळजीपणे वाहन चालविले. प्रथम शोरूमसमोरील चार ते पाच दुचाकींना धडक देत कार पुढे सरसावली आणि त्यानंतर तिघांनाही जबर धडक बसली.
या अपघातात शितल खरोटे हिला गंभीर मार लागून तिचा जागीच मृत्यू झाला, तर सनी राम पुरी आणि रवींद्र पुरी हे दोघे गंभीर जखमी झाले. अपघाताचा मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक व व्यावसायिक तत्काळ मदतीसाठी धावले.
या घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयंत शिरसाट आणि उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. शितल खरोटे हिला बिटको रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले.
दरम्यान, शितल खरोटे ही अविवाहित असून तिच्या पश्चात अर्धांगवायूग्रस्त वडील, आई आणि तीन बहिणी असा परिवार आहे. घरातील ती सर्वात धाकटी असल्याने या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV