लातूर : मतदारांनी एसआयआर मोहिमेत सहकार्य करावे
लातूर, 28 मार्च (हिं.स.) : भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी,महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार लातूर जिल्हा प्रशासनामार्फत मतदार यादीचे विशेष सघन पुनरावलोकन (SIR) कार्यक्रम लवकरच राबविण्यात येणार आहे.या मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील अस
मतदारांना आवाहन


लातूर, 28 मार्च (हिं.स.) : भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी,महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार लातूर जिल्हा प्रशासनामार्फत मतदार यादीचे विशेष सघन पुनरावलोकन (SIR) कार्यक्रम लवकरच राबविण्यात येणार आहे.या मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील अस्पष्ट फोटो, दुबार नावे आणि 'एसआयआर मॅपिंग' (SIR Mapping) यांसारखी महत्त्वाची कामे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश प्राप्त झाले आहेत.या पार्श्वभूमीवर लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पंचायत समिती सभागृह येथे शहरातील सर्व नगरसेवक,राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि बीएलओ पर्यवेक्षकांची आढावा बैठक झाली.या बैठकीत उपस्थितांना एसआयआर कार्यक्रम,मॅपिंग आणि मतदारांमधील जनजागृतीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

सध्या लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे मॅपिंगचे केवळ ५१टक्के कामकाज पूर्ण झाले असून, हे काम ३१ मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करणे अनिवार्य आहे.बीएलओ घरोघरी भेट देऊन माहिती संकलित करत असताना अनेक मतदार सहकार्य करत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून,माहिती उपलब्ध करून न दिल्यास संबंधित मतदारांना सुनावणीसाठी बोलावले जाईल. ज्या मतदारांचे मॅपिंग पूर्ण झालेले नाही,त्यांना बीएलओमार्फत २ ते ३ वेळा सुनावणीची नोटीस दिली जाईल आणि सुनावणीस उपस्थित राहून पुरावे सादर केल्यास त्यांचे नाव मतदार यादीत कायम ठेवले जाईल.मात्र,सुनावणीसाठी अनुपस्थित राहिल्यास किंवा पुरावे सादर न केल्यास मतदाराचे नाव मतदार यादीतून थेट वगळले जाईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

२३४-लातूर ग्रामीण व २३५-लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांनी आपापल्या रहिवास क्षेत्रातील बीएलओ यांची समक्ष भेट घेऊन त्यांना आवश्यक माहिती उपलब्ध करून द्यावी.मतदारांनी स्वतःचा किंवा कुटुंबातील सदस्यांचा २००२ च्या मतदार यादीतील तपशील अधिकृत संकेतस्थळावर किंवा 'ECINET' ॲपवर शोधून बीएलओना सहकार्य करावे,तसेच विवाहित महिलांनी त्यांच्या माहेरच्या नातेवाईकांची २००२ च्या यादीतील माहिती उपलब्ध करून द्यावी,असे आवाहन उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे व तहसीलदार सौदागर तांदळे यांनी यावेळी केले.या बैठकीस मनपा उपायुक्त पंजाब खानसोळे,नायब तहसीलदार अर्चना मैंदर्गी यांच्यासह बीएलओ,पर्यवेक्षक उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande