
जळगाव, 30 मार्च (हिं.स.) मालमत्ता कर वसुलीसाठी जळगाव महापालिका प्रशासनाने आता आक्रमक भूमिका घेतली असून कर थकबाकीदारांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. थकीत मालमत्ता करावरील दंडमाफी योजनेची मुदत संपण्यास अवघे दोन दिवस उरले असताना ७९ मोठ्या थकबाकीदारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.३१ मार्चपर्यंत थकीत रक्कम न भरल्यास १ एप्रिलपासून या मालमत्तांना थेट टाळे ठोकून जप्तीची कारवाई सुरू करण्यात येणार आहे. या अनुषंगाने यादी प्रसिद्ध करण्यात आली.
मनपाने आतापर्यंत ७८ कोटी रुपयांची वसुली केली आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या थकबाकीदारांच्या यादीत केवळ खासगी व्यक्तीच नाहीत, तर प्रतिष्ठित सामाजिक संस्थांच्या कार्यालयांचा आणि सभागृहांचाही समावेश आहे, त्यात क्षत्रिय मराठा समाज सामाजिक व सांस्कृतिक सभागृह, वैश्यवाणी समाज मंदिर, जळगाव जिल्हा सेवा समिती (अध्यक्ष), नाभिक समाज जिल्हा ट्रस्ट तसेच एमआयडीसीतील नामांकित प्लास्टिक फॅक्टरी, पेपर मिल्स आणि अॅग्रो तर राजकीय नेत्यांची कार्यालये आणि खासगी दुकानांचाही समावेश आहे मनपाच्या कर संकलन विभागाने आतापर्यंत वसुली मोहीम राबवून ७८ कोटी रुपये तिजोरीत जमा केले आहेत.सुटीच्या दिवशीही कर भरणा केंद्रांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर