
नवी दिल्ली , 30 मार्च (हिं.स.)।पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. युद्धासारख्या गंभीर मुद्द्यांवर राजकारण करणे योग्य नसून, या विषयावर देशाने एकजूट दाखवली पाहिजे, असे त्यांनी म्हटले.
प्रियंका गांधी यांनी स्पष्ट केले की या मुद्द्यावर संपूर्ण देश एकत्र उभा आहे. मात्र, त्याचवेळी त्यांनी सरकारकडे सध्याच्या आव्हानांवर ठोस उपाययोजना मांडण्याची मागणी केली. याच कारणामुळे विरोधक संसदेत या विषयावर सविस्तर चर्चा व्हावी, अशी मागणी करत आहेत, जेणेकरून सर्व पक्षांनी एकत्र येऊन मार्ग काढता येईल, असे त्यांनी सांगितले.
आपल्या वक्तव्यात प्रियंका गांधी वाड्रा यांनी सामान्य नागरिकांशी संबंधित प्रश्नांनाही वाचा फोडली. त्यांनी सांगितले की स्वयंपाक गॅस (एलपीजी) सिलिंडरच्या किंमती इतक्या वाढल्या आहेत की सर्वसामान्यांना तो खरेदी करणे कठीण झाले आहे. महागाईचा थेट परिणाम गरीब आणि मध्यमवर्गीयांवर होत असून त्यांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा मोठा परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
देशासमोर उभ्या असलेल्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी संसदेत अर्थपूर्ण आणि सखोल चर्चा होणे अत्यंत आवश्यक असल्यावर काँग्रेस खासदारांनी भर दिला. सर्व पक्षांनी एकत्रित विचारमंथन केल्यास अधिक चांगले उपाय समोर येऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode