
चंदीगड, 30 मार्च (हिं.स.)आयपीएल २०२६ च्या चौथ्या सामन्यात मंगळवारी पंजाब किंग्सचा सामना गुजरात टायटन्सशी होईल. हा सामना मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात एकूण सहा सामने खेळले गेले आहेत. यापैकी पंजाब किंग्सने तीन, तर गुजरातने तीन सामने जिंकले आहेत.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाबने गेल्या हंगामात अंतिम फेरी गाठली होती. पण, विजेतेपदाच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी) कडून संघाला पराभव सहन लागला होता. या हंगामातही पंजाबचा संघ खूप मजबूत दिसत आहे. पंजाब पुन्हा एकदा प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग या सलामीच्या जोडीकडून दमदार कामगिरीची अपेक्षा करत असेल. कर्णधार श्रेयस अय्यर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची जबाबदारी सांभाळताना दिसेल. अय्यरने गेल्या हंगामात शानदार फलंदाजी करत १७ सामन्यांमध्ये १७५ च्या स्ट्राईक रेटने ६०४ धावा केल्या. पंजाबच्या कर्णधाराने संपूर्ण हंगामात सहा अर्धशतके झळकावली.
पंजाब किंग्सला नेहल वाढेरा आणि शशांक सिंग यांच्याकडूनही दमदार कामगिरीची अपेक्षा असेल. आयपीएल २०२५ मध्ये नेहल चांगल्या फॉर्ममध्ये दिसला होता, त्याने १६ सामन्यांमध्ये १४५ च्या स्ट्राईक रेटने ३६९ धावा केल्या होत्या. मार्कस स्टोइनिस, मार्को जानसेन आणि उमरझाई फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देतील. दरम्यान, मिचेल ओवेन आणि कूपर कॉनोली आयपीएल २०२६ मध्ये प्रभावी कामगिरी करून आपली छाप पाडण्याचा प्रयत्न करतील.
दुसरीकडे, गुजरात टायटन्सला या हंगामात साई सुदर्शन आणि कर्णधार शुभमन गिल यांच्याकडून दमदार कामगिरीची अपेक्षा असेल. सुदर्शन गेल्या हंगामात १५ सामन्यांमध्ये ७५९ धावा करून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता, तर गिलने ६५० धावा केल्या होत्या. मात्र, जोस बटलरचा अलीकडील फॉर्म संघासाठी निश्चितच चिंतेचा विषय असेल. ग्लेन फिलिप्सच्या कामगिरीवरही बारकाईने लक्ष ठेवले जाईल. वॉशिंग्टन सुंदर, जेसन होल्डर आणि राहुल तेवतिया फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीद्वारे संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न करतील. कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, इशांत शर्मा आणि ल्यूक वूड यांच्या उपस्थितीमुळे संघाचा वेगवान गोलंदाजीचा मारा मजबूत दिसतो. दरम्यान, राशिद खान फिरकी विभागाचे नेतृत्व करेल, त्याला साई किशोर आणि सुंदर यांची साथ मिळणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे