फिडे कॅन्डिडेट्स २०२६: पहिल्या फेरीत आर. प्रज्ञानंदची अनिश गिरीवर मात
नवी दिल्ली, ३० मार्च (हिं.स.) भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने फिडे कॅन्डिडेट्स २०२६ च्या पहिल्या फेरीत शानदार कामगिरी करत अनिश गिरीला पराभूत करून आपल्या मोहिमेची दमदार सुरुवात केली. प्रज्ञानंदने गिरीवर सतत दबाव कायम ठेवत सामना अंतिम टप्प्यात खे
आर. प्रज्ञानंद आणि अनिश गिरी


नवी दिल्ली, ३० मार्च (हिं.स.) भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने फिडे कॅन्डिडेट्स २०२६ च्या पहिल्या फेरीत शानदार कामगिरी करत अनिश गिरीला पराभूत करून आपल्या मोहिमेची दमदार सुरुवात केली. प्रज्ञानंदने गिरीवर सतत दबाव कायम ठेवत सामना अंतिम टप्प्यात खेचून आणला. जवळपास ४० चालींनंतर, या भारतीय खेळाडूने प्याद्याच्या आघाडीसह निर्णायक आघाडी घेतली आणि गिरीच्या पुनरागमनाची आशा संपुष्टात आणली.

दिवसातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या सामन्यात, अमेरिकन फॅबियानो कारुआनाने एका रोमांचक आणि दीर्घकाळ चाललेल्या सामन्यात हिकारू नाकामुराला पराभूत केले. हा पहिल्या फेरीतील सर्वात लांब चाललेला सामना होता. इतर सामन्यांमध्ये, उझबेकिस्तानच्या झवोखिर सिंदारोव्हने रशियाच्या आंद्रेई एसिपेंकोला पराभूत केले, तर जर्मनीच्या मॅथियास ब्लूबाम आणि चीनच्या वेई यी यांच्यातील सामना अनिर्णित राहिला.

महिलांच्या गटात, भारताची युवा ग्रँडमास्टर दिव्या देशमुखने सुरुवातीच्या टप्प्यात आक्रमक खेळ केला, पण युक्रेनच्या ॲना मुझीचुकने आपला संयम राखत सामना बरोबरीत आणला. तिने वेळेवर सोंगट्यांची अदलाबदल करून गुण बरोबरीत आणले. दुसऱ्या एका सामन्यात, आर. वैशालीने कझाकस्तानच्या बिबिसारा असाउबायेवाविरुद्ध सावध रणनीती अवलंबत सामना अनिर्णित राखला. सामन्याच्या मधल्या टप्प्यात वैशाली दबावाखाली दिसत होती आणि तिच्याकडे वेळ कमी होता. पण तिने शेवटच्या क्षणी अचूक चाली खेळून सामना अतिरिक्त वेळेत नेला, ज्यामुळे अखेरीस सामना अनिर्णित राहिला.चीनच्या झू जिनर आणि टॅन झोंगयी यांच्यातील सामना अत्यंत चुरशीचा ठरला आणि अनिर्णित राहिला. कॅटरिना लॅग्नो आणि अलेक्झांड्रा गोर्याचकिना यांच्यातील सामनाही अनिर्णित राहिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande