आयपीएल 2026: मुंबईचा कोलकातावर ६ विकेट्स राखून विजय, १४ वर्षांनंतर सलामीचा सामना जिंकण्यात यश
मुंबई, 30 मार्च (हिं.स.)रोहित शर्मा (७८) आणि रायन रिकेल्टन (८१) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघावर सहा गडी राखून विजय मिळवला.मुंबईने शेवटचा हंगामाचा सलामीचा सामना २०१२ मध्ये जिंकला होता. तेव्हापासून त
शार्दुल ठाकूर


मुंबई, 30 मार्च (हिं.स.)रोहित शर्मा (७८) आणि रायन रिकेल्टन (८१) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघावर सहा गडी राखून विजय मिळवला.मुंबईने शेवटचा हंगामाचा सलामीचा सामना २०१२ मध्ये जिंकला होता. तेव्हापासून त्यांनी एकही सामना जिंकला नव्हता. आता, केकेआरला पराभूत करत मुंबईने हा नकोसा विक्रम मोडला आहे.

वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, अजिंक्य रहाणे (६७) आणि अंगक्रिश रघुवंशी (५१) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर केकेआरने २० षटकांत चार गडी गमावून २२० धावा केल्या. प्रत्युत्तरात, मुंबईने रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर १९.१ षटकांत चार गडी गमावून २२४ धावा करत सामना जिंकला.

२२१ धावांचे लक्ष्य गाठताना, मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन यांच्यामुळे धडाकेबाज सुरुवात केली. या दोन फलंदाजांनी ११.५ षटकांत १४८ धावांची सलामीची भागीदारी केली. रोहित ७८ धावांवर बाद झाला. आपल्या ३८ चेंडूंच्या खेळीत रोहितने सहा चौकार आणि तितकेच षटकार मारले. त्याने २३ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले, जे आयपीएलमधील त्याचे सर्वात जलद अर्धशतक ठरले. हे रोहितचे ५० वे आयपीएल अर्धशतकही होते. रिकेल्टननेही ४३ चेंडूंमध्ये आठ षटकार आणि चार चौकारांसह ८१ धावा केल्या. सूर्यकुमार यादव आठ चेंडूंमध्ये १६ धावांवर बाद झाला. तिलक वर्माने १४ चेंडूंमध्ये २० धावा केल्या. हार्दिक ११ चेंडूंमध्ये १८ धावांवर नाबाद राहिला, तर नमन धीर दोन चेंडूंमध्ये पाच धावांवर नाबाद राहिला. केकेआरकडून वैभव अरोरा, कार्तिक त्यागी आणि सुनील नरेन यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना केकेआरने फिन ऍलन आणि अजिंक्य रहाणे यांच्या जोरावर धडाकेबाज सुरुवात केली. त्यांनी ५.२ षटकांत पहिल्या विकेटसाठी ६९ धावा जोडल्या. ऍलन १७ चेंडूंमध्ये सहा चौकार आणि दोन षटकारांसह ३७ धावा करून बाद झाला. त्यानंतर रहाणे आणि ग्रीन यांनी २१ चेंडूंमध्ये दुसऱ्या विकेटसाठी ४० धावांची भागीदारी केली. संघाची धावसंख्या १०९ असताना ग्रीन १० चेंडूंमध्ये १८ धावा करून बाद झाला. त्यानंतर रहाणेने अंगक्रिश रघुवंशीसोबत तिसऱ्या विकेटसाठी ३६ धावा जोडून संघाची धावसंख्या १४५ पर्यंत पोहोचवली. रहाणेने ४० चेंडूंमध्ये पाच षटकार आणि तीन चौकारांसह शानदार ६७ धावा केल्या. रहाणे बाद झाल्यानंतर, रघुवंशी आणि रिंकू सिंग यांनी डावाची सूत्रे हाती घेतली आणि चौथ्या विकेटसाठी ३० चेंडूंमध्ये ६० धावांची भागीदारी करून संघाची धावसंख्या २०५ पर्यंत पोहोचवली. दोन षटकार आणि सहा चौकारांच्या मदतीने २९ चेंडूंमध्ये ५१ धावांची खेळी करून रघुवंशी बाद झाला. रिंकू सिंग चार चौकारांच्या मदतीने २१ चेंडूंमध्ये ३३ धावांवर नाबाद राहिला आणि रमणदीप सिंग चार धावांवर नाबाद राहिला. मुंबई इंडियन्सकडून शार्दुल ठाकूरने तीन बळी घेतले, तर हार्दिक पांड्याला एक बळी मिळाला.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande