
लातूर, 31 मार्च (हिं.स.)।लातूर जिल्ह्यातील कासार सिरसी पोलीस ठाणे हद्दीत तांबाळा येथील ब्रिक यार्ड स्पोर्ट क्लब मध्ये दिनांक 30 मार्च 2026 रोजी सायंकाळी सुमारे 09.30 वाजताच्या सुमारास अज्ञात आरोपींकडून दरोड्याची गंभीर घटना घडली. या प्रकरणी कासार सिरसी पोलीस ठाण्यात गुरनं 55/2026 कलम 310 (2), 311 भारतीय न्याय संहिता (BNS) व सहकलम 3/25 भा. ह. का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी फिर्यादीने यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पाच अनोळखी आरोपींनी क्लबमध्ये घुसून बंदुकीचा धाक दाखवत दहशत निर्माण करून रोख रक्कम व मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून घेत सशस्त्र दरोडा टाकला.
घटनेची पोलीस स्टेशन कासार शिरशी यांना रात्री 10.00 वाजताचे सुमारास माहिती मिळताच सदर बाब तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आली. पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार व अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कासार सिरसी पोलीस ठाण्याच्या पथकाने तात्काळ परिसरात नाकाबंदी करून आरोपींचा शोध सुरू केला. कासार शिरशी पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी श्री प्रवीण राठोड यांनी तात्काळ पोलीस स्टेशन औराद शहाजनी, किल्लारी, निलंगा, औसा ,उमरगा व पोलीस स्टेशन बसवकल्याण राज्य कर्नाटक या पोलीस स्टेशनची तात्काळ संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती देऊन नाकाबंदी करणेबाबत माहिती दिली.
दरम्यान, दरोड्यात वापरण्यात आलेली संशयित विनानंबर इनोव्हा गाडी भरधाव वेगाने शिराढोण कडे पळून जात असल्याचे पोलिसांच्या माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून शिराढोण पाटी येथील नाकाबंदी पॉईंटवर सदर वाहन 31 मार्च 2026 चे मध्यरात्री 12.00 वाजताचे सुमारास अडविले. त्यावेळी आरोपी वाहनातून उतरून अंधाराचा फायदा घेत पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी एका आरोपीस शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव कार्तिक कलाप्पा भोकले (वय 27 वर्ष, रा. भूसनी वाडी, ता. उमरगा, जि. धाराशिव) असे असून त्याने आपल्या इतर चार साथीदारांसह सदर दरोड्यात सहभाग असल्याची कबुली दिली आहे. त्याच्या ताब्यातून वाहन, मोबाईल फोन तसेच दरोड्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे.
ही कारवाई दिनांक 30 मार्च रोजी रात्री सुमारे 10.00 ते दिनांक 31 मार्च चे मध्यरात्री 12.30 या कालावधीत अत्यंत तत्परतेने पार पाडण्यात आली. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी निलंगा श्री. ढुमे, उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदपूर श्री. रायबोले, स्थानिक गुन्हे शाखा प्रभारी अधिकारी श्री सुधाकर बावकर तसेच इतर वरिष्ठ अधिकारी यांनी भेट देऊन पाहणी करून पुढील तपास कामी मार्गदर्शन केले आहे.
सदर प्रकरणातील फरार चार आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा तसेच कासार सिरसी पोलीस ठाण्याच्या अधिकारी अमलदारांचे चार विशेष पथके तयार करून रवाना करण्यात आली असून आरोपींना लवकरच अटक करण्यात येणार आहे.
ही संपूर्ण कारवाई माहिती मिळाल्यापासून तत्काळ अवघ्या काही तासातच पोलीस ठाणे कासार सिरसीचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप गर्जे, पोलीस उपनिरीक्षक अजय पाटील तसेच पोलीस अंमलदार राजू हिंगमिरे, हरि डावरगावे, आबा इंगळे, शंकर बुडे, मनोज चव्हाण, श्रीनिवास देशमुख, बाळू गायकवाड, नवनाथ इंदापुरे आदींनी संयुक्तरित्या पार पाडली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis