
मुंबई, 04 मार्च (हिं.स.) : ज्ञानेश्वरी आणि भागवत हे स्वतंत्र ग्रंथ नाहीत ते भाष्य आहेत. नामदेव महाराजांची गाथा आणि संत तुकाराम महाराजांची गाथा हे पण स्वतंत्र ग्रंथ नसून ते फक्त संकलन आहे. असे वादग्रस्त विधान श्रीराम जन्मभूमि ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी यांनी पुण्यातील संमेलनात केले आहे. याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते जयंतराव पाटील यांनी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडून आक्षेप घेतला.
जयंतराव पाटील म्हणाले की, ज्ञानेश्वरी हा फक्त ग्रंथ नाही तर ज्ञान देणारा स्वतंत्र प्रज्ञा प्रवाह आहे. तुकाराम महाराजांचा गाथा पाचवा वेद मानला जातो. या ग्रंथांना दुय्यम ठरवणे किंवा संकलन म्हणणे हा वारकरी संप्रदायाचा आणि करोडो भाविकांचा अपमान आहे. दासबोध आणि ज्ञानेश्वरी, गाथा यांची तुलना करून एकाला श्रेष्ठ आणि दुसऱ्याला दुय्यम दाखवणे हे अत्यंत क्लेशदायक आहे. ज्ञानेश्वर महाराज पाया, तुकाराम महाराज कळस आहेत. या ग्रंथानी जातीपातीच्या भिंती तोडून भक्ती, समानता आणि बधूतेचा मार्ग दाखवला. अशा क्रांतीकारी ग्रंथांना भाष्य आणि संकलन म्हणणे हे सामाजिक क्रांतीकडे दुर्लक्ष करण्यासारखे आहे.
स्वामी गोविंद देवगिरी यांच्यासारख्या जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीने असे विधान केल्यामुळे समाजात तेढ निर्माण होऊ शकते. समस्त वारकरी संप्रदायाने आणि महाराष्ट्रातील जनतेने याचा निषेध नोंदवला आहे. अशा वक्तव्यावर सभागृहाने देखील निषेध नोंदवावा. स्वामी गोविंद देवगिरी यांनी लोकांची माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी