
जळगाव, 04 मार्च (हिं.स.) मार्च महिन्याच्या प्रारंभासोबतच जळगाव शहरासह जिल्ह्यात उन्हाळ्याची चाहूल स्पष्टपणे जाणवू लागली असून फेब्रुवारीच्या तुलनेत तापमानात वाढ होताना दिसत आहे. कमाल तापमानाने ३७ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. यामुळे दिवसा उन्हाचा कडाका जाणवत असतानाच रात्री मात्र तापमानात मोठी घट झाल्याने जळगावकरांना ‘कधी गरम, तर कधी नरम’ अशा विचित्र हवामानाचा सामना करावा लागत आहे गेल्या महिन्यात जिल्ह्यात तापमानात चढ उतार दिसून आले. कधी थंडी तर कधी उन्हाचा चटका वाढताना दिसून आले. दरम्यान, आता मार्च महिन्याच्या सुरुवातीला मात्र दिवसाच्या कमाल तापमानात वाढ दिसून आली. गेल्या दोन दिवसांतील आकडेवारी पाहता, ३ मार्च रोजी कमाल तापमान ३६.५ अंश सेल्सिअस होते, त्यात ४ मार्च रोजी ०.७ अंशांची वाढ होऊन पारा ३७.२ अंशांवर पोहोचला आहे.मात्र, धक्कादायक बाब म्हणजे किमान तापमानात २.६ अंशांची मोठी घट नोंदवण्यात आली आहे. ३ मार्च रोजी १७.० अंश असलेले किमान तापमान ४ मार्चला थेट १५.६ अंशांपर्यंत खाली आले आहे. यामुळे जळगावकरांना दिवसा घाम फोडणारे ऊन आणि रात्री काहीसा गारवा, अशा दुहेरी हवामानाचा अनुभव येत आहे.दरम्यान, सध्या उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव आता पूर्णपणे ओसरला आहे. यंदा केवळ डिसेंबर महिन्यातच कडाक्याची थंडी जाणवली होती. आता मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाळ्याची चाहूल लागली असून उन्हाची तीव्रता आगामी काळात आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी सतर्क राहून आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर