
पुणे, 05 मार्च, (हिं.स.)। अतिवृष्टी व प्रतिकूल हवामानामुळे सुमारे अडीच हजार एकर क्षेत्रातील द्राक्ष बागांना अपेक्षित घड निर्मिती न झाल्याने यंदाचे वर्ष जुन्नर तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांना आर्थिक अडचणीचे ठरले आहे. सुमारे १०० कोटी रुपयांचा फटका तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांना बसला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.तालुक्यातील द्राक्ष तोडणीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे.द्राक्ष निर्यात व देशांतर्गत बाजारपेठेतील स्थानिक विक्रीतून यंदा जेमतेम यावर्षी पस्तीस कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.
मागील ४० वर्षात प्रथमच द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने हंगाम वाया गेला आहे. निर्यातक्षम जम्बो जातीच्या द्राक्ष उत्पादनात जुन्नर तालुका राज्यात अग्रेसर समजला जातो.जम्बो, शरद सीडलेस, फ्लेम, क्रिमसन, किंग बेरी, सुपर सोनाका, थॉमसन सीडलेस आदी जातीच्या द्राक्षाचे उत्पादन तालुक्यात घेतले जाते. यापैकी सर्वाधिक जम्बो द्राक्ष उत्पादन घेतले जाते. सुमारे पन्नास वर्षांपूर्वी स्व. भालचंद्र बनकर, अनिल मेहेर, प्रकाश पाटे यांनी तालुक्यात द्राक्ष लागवडीची प्रयोग केला. ही परंपरा पुढे सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु