
धुळे, 05 मार्च, (हिं.स.) धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात भेसळयुक्त दुधाचा पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील खर्दे गावातील रहिवासी आशाबाई बोरसे यांनी नेहमीप्रमाणे रात्री दूधवाल्याकडून अर्धा लिटर दूध खरेदी केले होते. मात्र हे दूध गरम केल्यानंतर संपूर्ण दूध रबरसारख्या गोळ्यात परिवर्तित झाल्याचे आढळून आले.
आशाबाई बोरसे यांनी सांगितले की, दूध उकळत असताना त्यामध्ये वेगळाच बदल दिसू लागला. उकळी आल्यानंतर दूध घट्ट होऊन एकसंध गोळ्यासारखे झाले. तो गोळा हाताने तुटत होता आणि त्याची रचना पूर्णपणे रबरसारखी भासत होती. हा प्रकार पाहून त्यांना मोठा धक्का बसला. विशेष म्हणजे त्या नेहमी त्याच दूधवाल्याकडून दूध घेत असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी कधीही असा अनुभव आला नव्हता. त्यामुळे दुधाच्या गुणवत्तेबाबत आणि सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
दरम्यान, शिरपूर तालुक्यात यापूर्वीही तीन ते चार महिन्यांपूर्वी भेसळयुक्त दुधाचा प्रकार उघडकीस आला होता. मात्र त्या वेळी संबंधित प्रशासनाकडून ठोस आणि प्रभावी कारवाई झाली नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. भेसळयुक्त दूध हे नागरिकांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना अशा दुधामुळे गंभीर आजारांचा धोका संभवतो. त्यामुळे या प्रकरणाची अन्न व औषध प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, दुधाचे नमुने तपासणीसाठी पाठवावेत आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून जोर धरत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर