बृहन्मुंबई महापालिकेच्या १७ पैकी ६ प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका संपन्न
मुंबई, 05 मार्च (हिं.स.) - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सन २०२६ - २०२७ या वर्षासाठी १७ प्रभाग समित्यांपैकी ६ प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदांची निवडणूक आज (दिनांक ५ मार्च २०२६) पार पडली. यात ३ ठिकाणी प्रत्येकी एक नामनिर्देश प्राप्त झाल्याने बिनविरोध
मुंबई महापालिका


मुंबई, 05 मार्च (हिं.स.) - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सन २०२६ - २०२७ या वर्षासाठी १७ प्रभाग समित्यांपैकी ६ प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदांची निवडणूक आज (दिनांक ५ मार्च २०२६) पार पडली. यात ३ ठिकाणी प्रत्येकी एक नामनिर्देश प्राप्त झाल्याने बिनविरोध तर ३ ठिकाणी एकापेक्षा जास्त नामनिर्देशन प्राप्त झाल्याने मतदान प्रक्रिया संपन्न झाली.

‘सी’ आणि ‘डी’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार श्री. आकाश राज पुरोहित यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.

‘आर मध्य’ आणि ‘आर उत्तर’ प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीसठी भारतीय जनता पक्षाचे श्री. प्रकाश यशवंत दरेकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.

तसेच ‘आर दक्षिण’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या श्रीमती लीना पटेल - देहेरकर यांची बिनविरोध निवड झाली.

‘ए’, ‘बी’ आणि ‘ई’ प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्री. ज्ञानराज निकम विजयी झाले. श्री. निकम यांना ७ तर प्रतिस्पर्धी उमेदवार भारतीय जनता पक्षाचे श्री. रोहिदास लोखंडे यांना ५ मते मिळाली.

‘एफ दक्षिण' व ‘एफ उत्तर’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना पक्षाच्या उमेदवार श्रीमती मानसी मंगेश सातमकर या ८ मते मिळवून विजयी झाल्या. त्यांच्या प्रतिस्पर्धी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार श्रीमती श्रद्धा श्रीधर जाधव यांना ७ मते मिळाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचे सदस्य या निवडणुकीवेळी अनुपस्थित होते.

‘पी पूर्व’ आणि ‘पी पश्चिम’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्री. हैदरअली अस्लम शेख हे १० मते मिळवून निवडून आले. तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार श्री. अजित बाळकृष्ण रावराणे यांना ८ मते मिळाली.

‘ए’, ‘बी’ आणि ‘ई’; ‘सी’ आणि ‘डी’; ‘एफ दक्षिण’ आणि ‘एफ उत्तर’ या तीन प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून महापौर श्रीमती रितू तावडे यांनी कामकाज सांभाळले.

तर ‘आर मध्य‘ आणि ‘आर उत्तर’; ‘आर दक्षिण’; ‘पी पूर्व’ आणि ‘पी पश्चिम’ या तीन प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून उप महापौर श्री. संजय घाडी यांनी कामकाज पाहिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande