
नांदेड, 05 मार्च (हिं.स.)।
येथील श्री गुरु गोबिंदसिंघजी विमानतळ येथून बहुप्रतिक्षित नांदेड ते गोवा विमानसेवा येत्या दि. ३१ मार्चपासून सुरू होत आहे. त्याचबरोबर नांदेड ते नागपूर विमानसेवा पुन्हा पूर्ववत होणार असून, बंगळुरूसाठी आणखी एका विमानसेवेची भर पडणार आहे. माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी ही माहिती देत या नव्या सेवांचे स्वागत केले आहे.
उपलब्ध माहितीनुसार स्टार एअर कंपनीची गोवा (मोपा) ते नांदेड ते नागपूर ही विमानसेवा मार्च अखेरीस सुरू होणार आहे. शुक्रवार वगळता आठवड्यातील सहा दिवस ही सेवा उपलब्ध राहील. या सेवेअंतर्गत गोवा (मोपा) येथून सकाळी ९.३० वाजता उड्डाण करणारे विमान सकाळी १०.५० वाजता नांदेड येथे पोहोचेल. त्यानंतर सकाळी ११.२० वाजता नांदेडहून उड्डाण घेऊन दुपारी १२.३० वाजता ते नागपूर येथे उतरेल. परतीच्या प्रवासात दुपारी १२.४० वाजता नागपूरहून उड्डाण घेणारे विमान दुपारी १.३० वाजता नांदेड येथे दाखल होईल. पुढे दुपारी २ वाजता नांदेडहून गोवा (मोपा) कडे उड्डाण करून दुपारी ३.२० वाजता तेथे पोहोचेल.
या शिवाय फ्लाय-९१ ही विमान कंपनी दि. २९ मार्चपासून नांदेड ते बंगळुरू विमानसेवा सुरू करणार आहे. त्यामुळे नांदेडहून बंगळुरूसाठी एकूण दोन विमानसेवा उपलब्ध होतील. या तीनही सेवा सुरू झाल्यानंतर नांदेडहून मुंबई, पुणे, नागपूर, गाझियाबाद (हिंडन), अहमदाबाद, गोवा, बंगळुरू आणि हैद्राबाद या आठ प्रमुख शहरांसाठी थेट विमानसेवा उपलब्ध होणार आहे. नांदेडच्या विकासाच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार असून, उद्योग, पर्यटन, शिक्षण आणि व्यावसायिक क्षेत्राला निश्चितच याचा मोठा लाभ होईल, असे खा. अशोकराव चव्हाण यांनी नमूद केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis