
पुणे, 05 मार्च (हिं.स.)। वाकड-कात्रज-शेवाळेवाडी या प्रस्तावित मेट्रोमार्गाबाबत पुणे महापालिकेने घाईघाईने निर्णय न घेता टप्प्याटप्प्याने पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यापूर्वी या मार्गाची तांत्रिक, आर्थिक आणि वाहतूकदृष्ट्या व्यवहार्यता (फिजिबिलिटी) तपासली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या प्रक्रियेनंतरच पुढील कार्यवाही होणार असून, अखेरीस महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची मान्यता घेणे बंधनकारक राहणार आहे
महापालिकेच्या प्रकल्प विभागाकडून 2 मार्च 2026 रोजी महामेट्रोच्या संचालकांना यासंदर्भात पत्र पाठविण्यात आले आहे. लोकप्रतिनिधींनी या मार्गासाठी डीपीआर तयार करण्याची मागणी केल्यानंतर महापालिकेने प्रथम व्यवहार्यता अभ्यास करण्याची भूमिका मांडली आहे. दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतही या मार्गावर प्राथमिक चर्चा झाली होती. बैठकीत थेट डीपीआरऐवजी आधी फिजिबिलिटी स्टडी करून वास्तव स्थिती स्पष्ट करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. त्यानुसारच महामेट्रोला अधिकृत पत्र पाठविण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु