
लातूर, 05 मार्च, (हिं.स.)। पोलीस फ्लॅश न्यूज अहमदपूर ( गोविंद काळे):ऐतिहासिक वारसा लाभलेल्या १९२१ च्या जिल्हा परिषद प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अहमदपूर नगर परिषद प्रशासनाचा बुरखा आता फाटला आहे. गेल्या पाच महिन्यांपासून सांडपाणी आणि फुटलेल्या पाईपलाईनच्या दुर्गंधीत शिक्षण घेणाऱ्या चिमुकल्यांचा अंत पाहणाऱ्या प्रशासनाला मुख्याध्यापकांनी आता शेवटचा इशारा दिला आहे. येत्या ६ मार्च २०२६ पासून चक्क नगर परिषद कार्यालयातच शाळा भरवण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्याध्यापकांनी पत्राद्वारे जाहीर केला असून, यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
स्वच्छता आणि पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी शाळेत आले, फोटो काढले आणि गेले; मात्र प्रत्यक्षात पाच महिने उलटूनही एक साधी पाईपलाईन दुरुस्त होऊ शकली नाही.
वर्गासमोर साचलेय 'नरकसदृश' पाणी
ईदगाह गेटकडे जाणाऱ्या नालीचे घाण पाणी आणि पिण्याच्या पाण्याची फुटलेली पाईपलाईन यामुळे शाळेच्या वर्गखोल्यांसमोर घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. केंद्रीय प्राथमिक शाळेच्या भिंतींना ओलावा लागून त्या खिळखिळ्या झाल्या आहेत. विद्यार्थ्यांना चिखल आणि मैल्याच्या पाण्यातून वाट काढत वर्गात जावे लागत आहे. परिसरात डास आणि माश्यांचे राज्य असून, एखादी मोठी साथ पसरल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल आता पालकांमधून विचारला जात आहे.
स्मरणपत्र-२ आणि निर्वाणीचा इशारा
मुख्याध्यापकांनी ६ नोव्हेंबर २०२५ रोजी पहिले पत्र (जा.क्र. ११५/२०२५) दिले होते. त्याची दखल न घेतल्याने आता 'स्मरणपत्र - २' द्वारे मुख्याधिकाऱ्यांना ठणकावून सांगण्यात आले आहे की, जर तात्काळ दुरुस्ती झाली नाही, तर ६ मार्चपासून नगर पालिकेच्या इमारतीतच शाळा भरवण्यात येईल. या पत्राच्या प्रतिलिपी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि पोलीस निरीक्षकांनाही पाठवण्यात आल्या आहेत.
प्रशासकीय अनास्थेचा कळस झाला आहे. आमच्या विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात असताना आम्ही गप्प बसू शकत नाही. जर शाळेत शिकण्यासाठी पोषक वातावरण मिळत नसेल, तर आम्ही नगर परिषदेच्या चकाचक कार्यालयात बसून विद्यार्थ्यांना शिकवू. > — मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्रशाला, अहमदपूर.
आता संपूर्ण अहमदपूरकरांचे लक्ष ६ मार्चकडे लागले आहे. लोकशाहीत प्रशासकीय निष्काळजीपणाविरुद्ध मुख्याध्यापकांनी उगारलेले हे 'शाळा' शस्त्र नगर परिषद प्रशासनाला ताळ्यावर आणणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis