किनवटमध्ये नऊ महसूल मंडळांत विशेष शिबिरे, तक्रारींचा जागेवरच होणार निपटारा
नांदेड, 05 मार्च (हिं.स.)। महसूल विभागाच्या सेवा अधिक पारदर्शक, गतिमान व नागरिकाभिमुख करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने ''छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान टप्पा एक राबविण्यात येत आहे. या अभियानातंर्गत किनवट तालुक्यातील नऊ महसूल मंडळा
किनवटमध्ये नऊ महसूल मंडळांत विशेष शिबिरे, तक्रारींचा जागेवरच होणार निपटारा


नांदेड, 05 मार्च (हिं.स.)।

महसूल विभागाच्या सेवा अधिक पारदर्शक, गतिमान व नागरिकाभिमुख करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान टप्पा एक राबविण्यात येत आहे. या अभियानातंर्गत किनवट तालुक्यातील नऊ महसूल मंडळांमध्ये विशेष समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांच्या प्रलंबित महसूल प्रकरणांचा जागेवर निपटारा करण्यावर भर देण्यात येणार आहे.

शेतकरी, महिला, विद्यार्थी, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या विविध तक्रारी व अर्जाची तत्काळ दखल घेऊन मार्गदर्शन व निर्णय देण्यासाठी संबंधित अधिकारी शिबिरस्थळी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे तहसील कार्यालयाच्या वारंवार फेऱ्या टाळून गावपातळीवरच सेवा उपलब्ध होणार आहे.

किनवट तालुक्यातील बोधडी बुद्रुक, सिंदगी (मो), जलधरा, इस्लापूर, शिवणी, दहेली, उमरी (बाजार), मांडवी तसेच किनवट मंडळ येथे नियोजित तारखांना ही शिबिरे पार पडणार आहेत.

बोधडी बु. ७ मार्च, सिंदगी (मो) दि. १४ मार्च, जलधरा दि. १० एप्रिल, इस्लापूर दि. १७ एप्रिल, शिवणी दि. २४ एप्रिल, दहेली दि. ३० एप्रिल, उमरी (बा) दि. १२ मे, किनवट दि. ८ मे, मांडवी दि. १५ मे. तालुक्यातील नागरिकांनी संबंधित दिवशी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.

अभिलेख दुरुस्ती, उत्पन्न, रहिवासी, जात व नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्रे, लोकसेवा हक्क कायद्यातील सेवा तसेच विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन आदी सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

प्रलंबित प्रकरणांना गती देण्यासाठी व नागरिकांना त्वरीत दिलासा मिळावा या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या या अभियानाचा तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चंद्रा दोन्तुला व तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande