लातूर: पंचायत समिती सभापती पदांसाठी ९ मार्च, जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी १६ मार्चला निवडणूक
लातूर, 06 मार्च (हिं.स.)। लातूर जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती पदांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार लातूर जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांसाठी १६ मार्च २
पंस जिल्हा परिषद निवडणूक


लातूर, 06 मार्च (हिं.स.)।

लातूर जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती पदांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार लातूर जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांसाठी १६ मार्च २०२६ रोजी दुपारी २ वाजता निवडणूक होणार असून सर्व पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती पदांसाठी ९ मार्च २०२६ रोजी दुपारी २ वाजता निवडणुका पार पडणार आहेत.

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ मधील कलम ११ (१) आणि ५९ (१) नुसार सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांचा कार्यकाळ पहिल्या बैठकीपासून सुरू होतो. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार लातूर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची पहिली बैठक २० मार्च २०२६ पूर्वी आयोजित करण्यात येणार आहे. त्यानुसार अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सभापती आणि उपसभापती पदांच्या निवडणुकीची प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे.

लातूर जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांची निवडणूक जिल्हा परिषदेच्या यशवंतराव सभागृहात पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी लातूरच्या अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, लातूर जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती पदांच्या निवडणुका संबंधित पंचायत समितीच्या सभागृहात घेण्यात येणार आहेत. या निवडणुकांसाठी संबंधित उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

निवडणूक प्रक्रियेसाठी संबंधित पीठासीन अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद सदस्य तसेच पंचायत समिती सदस्यांना आवश्यक नोटिसा पाठविल्या असून सर्व सदस्यांनी वेळेवर उपस्थित राहून निवडणूक प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकारी सायली ठाकूर यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande