
अमरावती, 06 मार्च (हिं.स.)
तिवसा मतदारसंघातील जावरा फत्तेपूर येथे अवैध वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी महसूल विभागाने नवीन शक्कल लढवत रस्त्यावर खड्डे खोदल्याने गावकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या निर्णयामुळे गावातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.जावरा फत्तेपूर हे गाव वर्धा नदीच्या काठावर असून गावातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून याच नदीकाठी अंत्यसंस्कार व दशक्रिया विधी पार पाडत आहेत. मात्र महसूल विभागाने वाळू तस्करी रोखण्यासाठी नदीकडे जाणाऱ्या रस्त्यात खोल खड्डे खोदल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी लागणारे साहित्य आणि अन्य वस्तू प्रेतयात्रेत सहभागी नातेवाईक व गावकऱ्यांना डोक्यावरून नदीपर्यंत नेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे “मृत्यूनंतरही नरकयातना भोगाव्या लागत आहेत”, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.याशिवाय गावातील नागरिक आपल्या गाई-म्हशी व बैलांना पाणी पिण्यासाठी दररोज वर्धा नदीवर नेत असतात. मात्र रस्त्यात खोदलेल्या खड्ड्यांमुळे जनावरांना दुखापत होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.या संपूर्ण प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण असून प्रशासनाने अवैध वाळू तस्करी रोखण्यासाठी पर्यायी उपाययोजना कराव्यात, तसेच नागरिकांची गैरसोय तातडीने दूर करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनीही या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी