पुणे जिल्ह्यातील ९ हजार कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ
पुणे, 07 मार्च (हिं.स.)। अंगणवाडी कर्मचारी, आशा कर्मचारी आणि अर्धवेळ परिचारिका आदी विविध नावांनी सरकारच्या विविध योजनांमध्ये काम करणाऱ्या सुमारे ९,०१५ कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) आणि पेन्शन योजना लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निकाल प्राद
पुणे जिल्ह्यातील ९ हजार कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ


पुणे, 07 मार्च (हिं.स.)। अंगणवाडी कर्मचारी, आशा कर्मचारी आणि अर्धवेळ परिचारिका आदी विविध नावांनी सरकारच्या विविध योजनांमध्ये काम करणाऱ्या सुमारे ९,०१५ कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) आणि पेन्शन योजना लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निकाल प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त अमित वशिष्ठ यांनी दिला आहे. सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनचे (सिटू) अध्यक्ष अजित अभ्यंकर आणि सरचिटणीस वसंत पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली. त्यांनीच या प्रकरणी कर्मचाऱ्यांच्या वतीने बाजू मांडली होती.

पत्रकार परिषदेप्रसंगी आशा कर्मचारी संघटनेच्या किरण मोघे, अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या शुभा शमीम, उपाध्यक्ष रजनी पिसाळ आदी उपस्थित होते. पुणे जिल्ह्यात १९८६ पासून अंगणवाडी योजना लागू झाली आहे. तेव्हापासून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा या निर्णयात विचार करण्यात आला आहे.सिटू’ने यासंदर्भात सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला होता. अखेर भविष्य निर्वाह निधी आयुक्तांकडे कायदेशीर मुद्द्यांच्या आधारे दाद मागितल्यानंतर हा निकाल लागला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील लाखो अंगणवाडी आणि आशा कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे अभ्यंकर यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande