रायगड जिल्हा परिषदेत पेच : अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणार, पण कार्यालय कुठे?
रायगड, 07 मार्च (हिं.स.)। रायगड जिल्हा परिषदेत अखेर सत्तास्थापनेची प्रक्रिया सुरू झाली असली, तरी पदाधिकाऱ्यांसाठी कार्यालय आणि निवासस्थानाची कोणतीही ठोस व्यवस्था नसल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे सत्ताधारी पदाधिकारी बसणार कुठे आणि कामकाज कसे
President-Vice President to be elected, but where will the office be? Trouble in Raigad Zilla Parishad


रायगड, 07 मार्च (हिं.स.)। रायगड जिल्हा परिषदेत अखेर सत्तास्थापनेची प्रक्रिया सुरू झाली असली, तरी पदाधिकाऱ्यांसाठी कार्यालय आणि निवासस्थानाची कोणतीही ठोस व्यवस्था नसल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे सत्ताधारी पदाधिकारी बसणार कुठे आणि कामकाज कसे चालणार, असा प्रश्न निर्माण झाला असून जिल्हा परिषद प्रशासनाच्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १२ मार्च रोजी अलिबाग येथील नियोजन भवनातील सभागृहात नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांची विशेष बैठक होणार आहे. या बैठकीत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया पार पडणार असून त्यानंतर जिल्हा परिषदेत अधिकृतपणे सत्तास्थापना होईल. यामुळे गेल्या साडेतीन वर्षांपासून सुरू असलेली प्रशासकीय राजवट संपणार आहे.

मात्र या सत्तास्थापनेपूर्वीच अनेक मूलभूत प्रश्न निर्माण झाले आहेत. रायगड जिल्हा परिषदेची शिवतीर्थ इमारत कमकुवत आणि नादुरुस्त झाल्यामुळे ती बंद करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या जिल्हा परिषदेचा कारभार कुंटेबाग येथील कार्यालयातून चालवला जात आहे. मात्र येथे जागेची मोठी कमतरता असल्याने सर्व विभागांना सामावून घेणेही प्रशासनाला शक्य झालेले नाही.

याच परिसरातील अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची अधिकृत निवासस्थाने सध्या कार्यालय म्हणून वापरात असल्यामुळे नव्याने निवडून येणाऱ्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांसाठी राहण्याची कोणतीही व्यवस्था उरलेली नाही. त्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या निवासाचा प्रश्नही गंभीर बनला आहे.

दरम्यान, तात्पुरत्या स्वरूपात अध्यक्षांच्या बंगल्यात अध्यक्षांचे कार्यालय तसेच दोन विषय समिती सभापतींची कार्यालये सुरू करण्याचा विचार आहे. त्याचप्रमाणे उपाध्यक्षांच्या बंगल्यात उपाध्यक्षांसह दोन सभापतींची कार्यालये उभारली जाणार आहेत. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ज्या ठिकाणी बसतात त्या जागेत आणखी एका सभापतीसाठी कार्यालय तयार केले जाणार आहे.

तथापि, जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभा आणि स्थायी समितीच्या बैठका कुठे घ्यायच्या, हा देखील मोठा प्रश्न आहे. १२ मार्च रोजीची विशेष बैठक नियोजन भवनात होणार असली, तरी या सभागृहासाठी सुमारे २५ हजार रुपये शुल्क आकारले जाते. त्यामुळे प्रत्येक बैठकीसाठी हे सभागृह वापरणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याची चर्चा आहे.

दरम्यान, कुंटेबाग परिसरात दुमजली इमारतीचे बांधकाम सुरू असून मे अखेरपर्यंत ते पूर्ण होण्याची शक्यता आहे. या नव्या इमारतीत अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समिती सभापतींसाठी स्वतंत्र दालने तसेच जिल्हा परिषदेचे सभागृह उभारले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. तोपर्यंत तात्पुरत्या व्यवस्थेवरच जिल्हा परिषदेला कारभार चालवावा लागणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande