ठाणे - राष्ट्रवादी (श.प.) ने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले चुल्हा जलाओ आंदोलन
ठाणे, 07 मार्च (हिं.स.)। इराण - इस्रायल युद्धाचे कारण पुढे करीत सरकारने घरगुती गॅस सिलिंडरचे दर 60 रूपयाने वाढविले आहेत. त्यानिषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, यांच्या नेतृत्वाखाली महिलाध्यक्षा मनिषा भगत
ठाणे


ठाणे, 07 मार्च (हिं.स.)। इराण - इस्रायल युद्धाचे कारण पुढे करीत सरकारने घरगुती गॅस सिलिंडरचे दर 60 रूपयाने वाढविले आहेत. त्यानिषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, यांच्या नेतृत्वाखाली महिलाध्यक्षा मनिषा भगत आणि युवक अध्यक्ष अभिजीत पवार यांच्या उपस्थितीत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखे आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी चूल पेटवून त्यावर भात शिजवून तसेच भाकरी भाजून दरवाढीचा निषेध केला.

इस्रायल आणि इराणमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅस सिलिंडरचे दर 60 तर व्यावसायिक सिलिंडरचे दर 118 रूपयांनी वाढविण्यात आले आहेत. या दरवाढीचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने चुल्हा जलाओ आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. तसेच, चूल पेटवून त्यावर भात शिजवला आणि भाकरीदेखील भाजल्या.

याप्रसंगी मनोज प्रधान म्हणाले, अमेरिका ठरवेल ते आपल्या देशाचे धोरण झाले आहे. त्यामुळेच युद्धाच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ करण्यात आली आहे. या युद्धाचा अंदाज आलेला असतानाही सरकारला नियोजन करता आले नाही, यावरून या सरकारची धोरणे कशी तकलादू आहेत, हेच स्पष्ट झाले आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या घरातील बजेट कोलमडून पडणार आहे. एकीकडे महिलांना लाडकी बहिण म्हणायचे आणि दुसरीकडे महिला दिनाच्या एक दिवस आधी दरवाढ लादून दरवाढीची भेट द्यायची, हे खपवून घेतले जाणार नाही. आजचे आंदोलन प्रातिनिधिक असले तरी महागाई विरोधातील आमचा लढा असाच कायम राहणार आहे.

दरम्यान, या सरकारने युद्धाच्या नावाखाली ही दरवाढ केली आहे. ही दरवाढ म्हणजे भारतीय जनतेची लूट आहे. आधीच महागाई वाढलेली असताना ही दरवाढ करणे योग्य नाही. सरकारने ही दरवाढ तत्काळ मागे घ्यावी, अशी मागणी मनिषा भगत यांनी केली.

या आंदोलनात युवक अध्यक्ष अभिजीत पवार, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, विद्यार्थी अध्यक्ष राहू पाटील, महिला कार्याध्यक्ष फुलबानो पटेल, साबिया मेमन, जिल्हा प्रशासन सरचिटणीस राजेश साटम , महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मकसुद खान ,राजू चापले ,मिलिंद बनकर, एकनाथ जाधव, संगीता लोकरे ,कैलास हावळे, दीपा गावंड, शशिकला पुजारी मल्लिका पिल्ले ,मनीषा पाटील, कुणाल भोईर, सचिन पंधरे , जगत सिंग, सुमित साधवाणी, शिवा कालू सिंह, पुजा जाधव, रेश्मा भानुशाली, विशांत गायकवाड, महेश मोरे, पद्माकर पाटील राजु पाटील, साहिल उदुगडे आदी सहभागी झाले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande