रंगपंचमी निमित्त लातूर पोलिसांचा कडक बंदोबस्त
- शांतता, सुरक्षितत व सौहार्दपूर्ण वातावरणात सण साजरा करण्याचे आवाहन लातूर, 07 मार्च (हिं.स.)। जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा केला जाणार आहे. या दिवशी नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येऊन रंगोत्सव स
रंगपंचमी


- शांतता, सुरक्षितत व सौहार्दपूर्ण वातावरणात सण साजरा करण्याचे आवाहन

लातूर, 07 मार्च (हिं.स.)।

जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा केला जाणार आहे. या दिवशी नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येऊन रंगोत्सव साजरा करत असल्याने शहर व जिल्ह्यात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी लातूर पोलीस दलाकडून जिल्हाभर व्यापक आणि कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. संवेदनशील व गर्दीच्या ठिकाणी विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून सणादरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.

रंगपंचमीच्या दिवशी शहरातील हनुमान चौक, ट्युशन एरिया, पाच नंबर चौक, नवा रेणापूर नाका, संविधान चौक, राजीव गांधी चौक तसेच इतर महत्त्वाच्या चौक व गर्दीच्या ठिकाणी विशेष नाकाबंदी व कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या ठिकाणी पोलिसांकडून संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवले जाणार असून वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.

महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दामिनी पथकाकडून विशेष गस्त वाढविण्यात आली आहे, तर वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक शाखेमार्फत विशेष ट्रॅफिक नियोजन करण्यात आले आहे. तसेच स्थानिक गुन्हे शाखा व डी.बी. विशेष पथके यांनाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून गुन्हेगारांवर कडक नजर ठेवण्यात येणार आहे.

रंगपंचमीच्या दिवशी काही युवकांकडून उत्साहाच्या भरात रॅश ड्रायव्हिंग, मोटारसायकलवर दोनपेक्षा अधिक जण बसून धोकादायक पद्धतीने वाहन चालविणे, स्टंटबाजी करणे तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे असे प्रकार घडण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांकडून विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. यासाठी पायी गस्त (फुट पेट्रोलिंग), बीट मार्शल, चार्ली मोटारसायकल पेट्रोलिंग तसेच जीप पेट्रोलिंग मोठ्या प्रमाणात सुरू ठेवण्यात येणार आहे.

याशिवाय मादक किंवा अमली पदार्थांचे सेवन करून वाहन चालविणाऱ्या व्यक्तींवर विशेष कारवाई करण्यात येणार असून अशा वाहनचालकांविरुद्ध कायद्यानुसार कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल.तसेच सायलेन्सर फटाके लावून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर तसेच रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे.

सणादरम्यान धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याबाबत विशेष दक्षता घेण्यात येणार असून आक्षेपार्ह घोषणा देणे, भडकाऊ बॅनर किंवा पोस्टर लावणे अशा प्रकारांवर पोलिसांकडून तात्काळ कारवाई करण्यात येईल. तसेच सार्वजनिक ठिकाणी महिलांची छेडछाड करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

यासोबतच जलद कृती दल (QRT) देखील सज्ज ठेवण्यात आले असून कोणतीही आकस्मिक परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी विशेष पथके तयार ठेवण्यात आली आहेत.

तसेच पुढील बाबींवरही पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.

👉🏻 धोकादायक रंगांचा वापर रोखण्यासाठी कारवाई.

रंगपंचमीच्या दिवशी रंगांमध्ये दाहक, रासायनिक किंवा ज्वलनशील पदार्थांचा वापर करून कोणालाही इजा पोहोचविण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित व्यक्तींविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

👉🏻 अवैध दारू विक्रीविरुद्ध विशेष मोहीम.

सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध भागात अवैध दारू विक्री, साठवणूक किंवा वाहतूक करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येणार असून पोलिसांकडून छापे टाकून कडक कारवाई करण्यात येईल.

👉🏻घातक शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कडक कारवाई.

सार्वजनिक ठिकाणी चाकू, तलवार, लोखंडी रॉड किंवा इतर घातक शस्त्रे बाळगून फिरणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून अशा व्यक्तींविरुद्ध शस्त्र कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

👉🏻सोशल मीडियावर विशेष नजर

सणाच्या काळात सोशल मीडियावर अफवा, भडकाऊ संदेश किंवा समाजामध्ये तेढ निर्माण करणारी माहिती प्रसारित करणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार असून अशा प्रकारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

👉🏻ध्वनी प्रदूषणाविरोधात कारवाई.

ध्वनी प्रदूषण प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन करून मोठ्या आवाजात ध्वनीवर्धक यंत्रणा वापरणे, सायलेन्सरमध्ये बदल करून मोठा आवाज करणारी वाहने चालविणे किंवा इतर प्रकारे ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

लातूर पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सदैव सज्ज असून सण-उत्सव शांततेत, आनंदात आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडावेत यासाठी पोलिसांकडून व्यापक नियोजन करण्यात आले आहे.नागरिकांनीही रंगपंचमी साजरी करताना जबरदस्तीने रंग लावणे टाळावे, वाहतूक नियमांचे पालन करावे, इतर समाज बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

सर्व नागरिकांनी परस्पर सहकार्य, समन्वय व बंधुता जपत रंगपंचमीचा सण सुरक्षित, शांततामय व खेळीमेळीच्या वातावरणात साजरा करावा, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande