
मनमाड, 07 मार्च (हिं.स.)।
मनमाड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ मधील प्रभाग क्रमांक ४ मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेले एळींजे मुकुंद गौतम यांनी आपल्या नामनिर्देशन पत्रात खोटी आणि अपूर्ण माहिती दिल्याची तक्रार प्रतिस्पर्धी उमेदवार गुरुकुमार सिद्धार्थ निकाळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली होती. या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आले असल्याची माहिती निकाळे यांनी दिली असुन मनमाड पालिकेचे मुख्याधिकारी व तत्कालीन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शेषराव चौधरी यांना याबाबत सखोल चौकशी करून विनाविलंब अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडुन देण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की मनमाड नगर परिषदेच्या निवडणूकित प्रभाग क्रमांक ४ मधून गुरुकुमार सिद्धार्थ निकाळे यांनी अनुसूचित जातीच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडुन उमेदवारी केली होती त्यांच्या विरोधात एळींजे मुकुंद गौतम हे प्रतिस्पर्धी उमेदवार होते त्यांनी त्यांच्या निवडणूक अर्जात अपुर्ण माहिती दिली होती याबाबत निकाळे यांनी यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार, एळींजे यांनी निवडणूक लढवण्यासाठी अर्जासोबत जी माहिती सादर केली, त्यात सत्यता नसून काही महत्त्वाचे मुद्दे लपवण्यात आले आहेत हे स्पष्ट होत आहे याबाबत राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी कार्यालयाला कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेचे सहआयुक्त श्याम विठ्ठल गोसावी यांनी तत्कालीन सहायक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांना याबाबत सखोल चौकशी करून विनाविलंब अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती निकाळे यांनी पत्राद्वारे प्रसिद्धीस दिली आहे.
प्रशासकीय कारवाई
राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेल्या पत्राची दखल घेत नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाचे सह आयुक्त शाम विठ्ठल गोसावी यांनी मनमाड नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. तक्रारीमध्ये नमूद केलेल्या मुद्द्यांची पडताळणी करून, आवश्यक पुराव्यांसह स्पष्ट अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी ही कारवाई केली जात असून, चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कायद्यानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे. यामुळे मनमाड राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
एळींजे यांच्याकडून निवडणूक आयोगाची दिशाभूल
प्रभाग क्रमांक चार मधुन अनुसूचित जाती या जागेवर आम्ही दोघांनी समोरासमोर निवडणूक लढवली होती या निवडणुकीत भरलेल्या नामनिर्देशन पत्रात मुकुंद एळींजे यांनी अपूर्ण माहिती भरली असुन बरीच माहिती लपवण्यात आली आहे ती सर्व माहिती आपण पुराव्यानिशी राज्य निवडणूक आयोगाकडे दिली असुन रीतसर तक्रार दाखल केली आहे जिल्हाधिकारी यांनी अहवाल बघुन एळींजे यांचे नगरसेवक पद तात्काळ रद्द करून आम्हाला न्याय द्यावा. - गुरुकुमार निकाळे,तक्रारदार
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV