
पुणे, 07 मार्च, (हिं.स.)। शहरातील वाढत्या हवा प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या अनियंत्रित बांधकामांवर कठोर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी नगरसेवक पुनीत जोशी यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी आयुक्त नवलकिशोर राम यांना पत्र दिले आहे.
शहरात मोठ्या प्रमाणावर इमारत बांधकामे सुरू असून रस्त्यांवरून जाणारे रेडीमिक्स सिमेंटचे ट्रक, डंपर आणि बांधकाम साहित्याची वाहतूक यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. तसेच अपघातांची शक्यताही वाढत आहे. जुनी इमारत पाडताना किंवा नवीन बांधकाम करताना धूळ मोठ्या प्रमाणावर हवेत उडते. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतो.यासाठी बांधकामस्थळी सुरक्षेसाठी जाळी व प्रतिबंधक पडदे लावणे, धूळ नियंत्रणासाठी कापड किंवा नेट बसविणे तसेच आवश्यक ठिकाणी नियमित पाण्याचा फवारा मारणे बंधनकारक करावे, अशी मागणी जोशी यांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु