
पुणे, 07 मार्च (हिं.स.)। पिंपरी-चिंचवड शहरातील वाढते जलप्रदूषण आणि काही भागांत पिण्याच्या पाण्यात दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाण्याच्या तपासणीसाठी त्रयस्थ संस्थेची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पिण्याचे आणि नद्यांच्या पाण्याची तपासणी करण्यासाठी एका प्रयोगशाळेची नियुक्ती केली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवला आहे.पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी आणि मुळा या तिन्ही नद्यांमधील प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. नाले, औद्योगिक सांडपाणी आणि रसायनयुक्त पाणी या नद्यांमध्ये मिसळते. त्यामुळे नद्यांमधील पाण्याची गुणवत्ता खालावत आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेही या नद्यांमध्ये प्रदूषण वाढल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. शहराला मावळातील पवना आणि आंद्रा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. पवना धरणातील पाणी पवना नदीतून रावेत बंधाऱ्यावरून आणि आंद्रा धरणातील पाणी इंद्रायणी नदीवरील निघोजे बंधाऱ्यातून उचलले जाते. त्यावर निगडी, चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून शहरातील नागरिकांना वितरित केले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शहराच्या विविध भागांतून गढूळ, दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु