
पुणे, 07 मार्च, (हिं.स.)। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत राष्ट्रीय महिला आयोग येत्या आठ ते १४ मार्च या कालावधीत देशातील पाचशे जिल्ह्यांत महिलांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी जनसुनावणी घेणार आहे. आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. महाराष्ट्रात तीन ठिकाणी जनसुनावणी होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
महिलांवरील अत्याचार थांबवावेत, त्यांना न्याय मिळावा आणि कामाची समान संधी प्राप्त व्हावी यासाठी आयोग काम करीत असल्याचे सांगत रहाटकर म्हणाल्या की, मागील काही काळापासून नियमित सुनावणी आणि जनसुनावणीच्या माध्यमातून महिलांच्या समस्यांची सोडवल्या जात आहेत. महिला दिनानिनित्त राज्य महिला आयोगांच्या सहकार्याने देशातील २५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये जनसुनावणी घेतली जाणार आहे. या जनसुनावणीमध्ये १५ हजारपेक्षा जास्त तक्रारी ऐकून घेत त्यावर मार्ग काढला जाणार आहे. मी स्वत: सोमवारी जयपूरला जाणार आहोत. त्यानंतर बडोदा, भोपाळ, मडिक्कल, देवघर आणि दुमका या शहरांत जात तेथील महिलांच्या तक्रारी ऐकून घेणार आहोत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु