
पुणे, 07 मार्च (हिं.स.)। राज्य शासनाने अकृषिक (एनए) कर रद्द केल्यामुळे पिंपरी चिंचवड शहर तसेच हवेली तालुक्यात आतापर्यंत ३८ हजार ९१७ हेक्टरवरील चार हजार ६३५ खातेदारांना फायदा झाला आहे. शेकडो कोटी रुपये कर तसेच थकबाकी माफ झाली आहे. शहरातील गृहनिर्माण संस्था आणि सदनिकाधारकांना हा मोठा दिलासा आहे.हवेली तालुक्यात पिंपरी चिंचवड शहरासह सुमारे १२३ ते १२८ महसूल गावे आहेत. शहराचा दिवसेंदिवस विस्तार होत असून लोकसंख्या वेगाने वाढत आहे. नागरीकरण वेगाने होत आहे.
गृहनिर्माण संस्था निर्माण होत आहेत. शहरी भागातील बांधकामांवरील जागांवर दरवर्षी अकृषिक कर आकारला जात होता. १० फेब्रुवारी २०२६ रोजी शासनाने परिपत्रक काढून हा कर रद्द करण्याचा निर्णय घेतला. जुन्या अकृषिक आकारणी व रूपांतरण कराच्या व्यवस्थेऐवजी एकवेळचे अधिमुल्य भरण्याची सोपी व्यवस्था करण्यात आली, मात्र या निर्णयापूर्वी झालेल्या बांधकामांवर आकारलेला कर रद्द केला जाणार का, तसेच भविष्यात बांधकाम परवानगी देताना हा कर बांधकाम व्यावसायिकांकडून एकरकमी वसूल केला जाणार का, असे प्रश्न उपस्थित झाले होते.अर्थसंकल्पीय अधिवेशनातील प्रश्नोत्तराच्या तासात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जुन्या किंवा नव्या कोणत्याही बांधकामांवर हा कर आकारला जाणार नाही. तसेच पूर्वीची थकबाकीदेखील शासनाने माफ केली असल्याची घोषणा केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु