
जळगाव, 07 मार्च (हिं.स.) शासनाचा खरा अर्थ म्हणजे लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणे होय. एखाद्या शेतकऱ्याची जमीनविषयक अडचण दूर झाली, एखाद्या विद्यार्थ्याला आवश्यक दाखला मिळाला किंवा एखाद्या कुटुंबाला घरकुलाचा लाभ मिळाला, तर त्या लाभार्थ्याच्या चेहऱ्यावर उमटणारे समाधानच या शिबिराचे खरे यश आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. धरणगाव तालुक्यातील सोनवद बु. येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरा’च्या प्रसंगी ते बोलत होते. या महसूल समाधान शिबिरामुळे शासनाच्या सेवा थेट गावपातळीवर उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी शेतकरी हितासाठी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांचाही त्यांनी उल्लेख केला. सरकारने दिलेला शब्द पाळत दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची अंमलबजावणी करण्यात आली असून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. शासन शेतकरी, गरीब आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी कटिबद्ध असून अधिकाऱ्यांनी लोकांशी संवेदनशीलतेने वागून शासनाच्या योजना प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले. ते पुढे म्हणाले की, पूर्वी नागरिकांना साध्या कागदपत्रांसाठीही विविध कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या. त्यामुळे वेळ आणि पैशाचा अपव्यय होत होता. या पार्श्वभूमीवर शासनाने प्रशासन थेट गावपातळीवर आणण्याचा निर्णय घेतला असून “शासन जनतेच्या दारी” ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या एकाच ठिकाणी सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्या काही वर्षांत या अभियानामुळे हजारो नागरिकांना सातबारा, उत्पन्न दाखले, सामाजिक सुरक्षा योजना तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळाला आहे. जोपर्यंत तळागाळातील शेवटच्या पात्र घटकापर्यंत योजना पोहोचत नाहीत, तोपर्यंत हे अभियान सुरूच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सुरू असलेल्या ‘महसूल समाधान शिबिरा’चा शुभारंभ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आला. या शिबिरात महसूल, कृषी, पंचायत समिती, आरोग्य तसेच विविध विभागांच्या माध्यमातून नागरिकांच्या अर्जांवर तत्काळ कार्यवाही करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले की, शासनाच्या विविध योजना आणि सेवा नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. महसूल समाधान शिबिरांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अडचणी तातडीने सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. नागरिकांनी या शिबिरांचा अधिकाधिक लाभ घ्यावा तसेच प्रशासनाशी थेट संवाद साधून आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर