
वॉशिंग्टन , 11 एप्रिल (हिं.स.)।अमेरिका आणि इराण शांतता चर्चेसाठी इस्लामाबाद येथे बैठक घेत आहेत. मात्र याचदरम्यान अमेरिकन अधिकाऱ्यांनी असा दावा केला आहे की, इराणने पसरवलेल्या सागरी बारूदी स्फोटकांचा (माइन्स) शोध घेण्यात आणि त्यांना हटवण्यात अपयश येत असल्यामुळे होर्मुज जलडमरूमध्य मार्गावरील सुरक्षित वाहतुकीत विलंब होत आहे. दरम्यान, नियमित जहाज वाहतूक पुन्हा सुरू करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दबाव वाढत आहे.
अमेरिकन अधिकाऱ्यांनी माध्यमाला दिलेल्या माहितीनुसार, होर्मुज जलडमरूमध्य पूर्णपणे पुन्हा सुरू करण्यात इराणला येणाऱ्या अडचणींच्या मुळाशी एक मूलभूत समस्या आहे. मध्य-पूर्वेतील संघर्षादरम्यान टाकलेल्या सर्व माइन्सचा शोध इराणला लागत नाही आणि त्यांना हटवण्यासाठी आवश्यक तांत्रिक क्षमता देखील त्याच्याकडे अपुरी आहे.
या समस्येची सुरुवात मागील महिन्यात झाली, जेव्हा अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधात कारवाई सुरू केल्यानंतर इराणने छोट्या नौकांच्या मदतीने या जलमार्गात माइन्स पसरवायला सुरुवात केली. माइन्स टाकण्यापूर्वीच या मार्गात अडथळे निर्माण होऊ लागले होते. सरकारी माध्यमांच्या अहवालानुसार, २ मार्च रोजी इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी) च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने हा जलडमरूमध्य बंद असल्याचे जाहीर केले आणि येथे प्रवेश करणाऱ्या कोणत्याही जहाजाला लक्ष्य केले जाऊ शकते, असा इशाराही दिला.
या घोषणेमुळे जहाज वाहतुकीत मोठी खळबळ उडाली आणि जगभरातील तेलाच्या किमती झपाट्याने वाढल्या. माइन्स पसरवल्यानंतर परिस्थिती आणखी गंभीर झाली. तेलवाहू जहाजांची ये-जा मोठ्या प्रमाणात घटली आणि इराणी ड्रोन तसेच क्षेपणास्त्र हल्ल्यांचा धोका वाढला. इराणने एक अरुंद जलमार्ग खुला ठेवला होता, ज्यातून टोल भरणाऱ्या जहाजांना जाण्याची परवानगी दिली जात होती. IRGC ने जहाजांना माइन्सच्या धोक्याबाबत सतर्क केले असून, अर्ध-सरकारी माध्यमांनी सुरक्षित मार्ग दर्शवणारे नकाशेही प्रसिद्ध केले आहेत, मात्र हे मार्ग अद्याप मर्यादित आहेत.
जलमार्ग वेगाने साफ करण्यात येणाऱ्या अडचणींमुळे सामान्य जहाज वाहतूक पुन्हा सुरू करण्याच्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या मागण्यांना इराणकडून प्रतिसाद देण्यात विलंब होत आहे. हा मुद्दा इस्लामाबाद येथे होणाऱ्या चर्चेत, इराणच्या परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधीमंडळ आणि अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंस यांच्यातील बैठकीत प्रमुखत्वाने उपस्थित राहणार आहे.
सागरी बारूदी माइन्स हटवणे, त्यांना पसरवण्यापेक्षा खूपच अधिक गुंतागुंतीचे ठरत आहे. प्रगत तंत्रज्ञान असूनही, अमेरिकन सैन्यालाही माइन्स हटवण्यासाठी विशेष तटीय युद्धनौकांवर अवलंबून राहावे लागते आणि त्यांची क्षमता मर्यादित आहे. अधिकाऱ्यांच्या मते, इराणकडे ही प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक साधने उपलब्ध नाहीत—अगदी त्याने स्वतः पसरवलेल्या माइन्ससाठीही.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode