
तेहरान, 11 एप्रिल (हिं.स.)।अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता चर्चेसाठी दोन्ही देशांचे प्रतिनिधीमंडळ इस्लामाबाद येथे पोहोचले आहेत. दरम्यान, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. एका अहवालानुसार, मोजतबा खामेनेई यांच्या चेहऱ्यावर गंभीर दुखापती झाल्या असून त्यांच्या एका किंवा दोन्ही पायांचे नुकसान झाल्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.
अहवालात म्हटले आहे की, युद्धाच्या सुरुवातीला त्यांच्या वडिलांवर म्हणजेच अली खामेनेई यांच्यावर झालेल्या हवाई हल्ल्यात मोजतबा खामेनेई गंभीर जखमी झाले होते. सध्या ते उपचार घेत असून हळूहळू बरे होत आहेत.सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांच्या प्रकृतीत जलद सुधारणा होत आहे. गंभीर दुखापती असूनही ते मानसिकदृष्ट्या सक्रिय आहेत. ते ऑडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठका घेत आहेत आणि युद्ध तसेच अमेरिकेसोबतच्या चर्चेसारख्या महत्त्वाच्या निर्णयप्रक्रियेत सक्रिय सहभाग घेत आहेत.
तथापि, त्यांच्या आरोग्यस्थितीमुळे इराणमधील महत्त्वाच्या घडामोडींवर लक्ष ठेवण्याच्या त्यांच्या क्षमतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. सध्या इराण अनेक दशकांतील सर्वात गंभीर संकटाचा सामना करत आहे. दरम्यान, पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथे शनिवारी अमेरिकेसोबत शांतता चर्चा सुरू होणार आहे.
मोजतबा खामेनेई यांचे ठिकाण, प्रकृती आणि प्रशासन चालवण्याची क्षमता अद्याप जनतेसाठी गूढच आहे. हवाई हल्ल्यानंतर आणि ८ मार्च रोजी वडिलांच्या जागी नियुक्ती झाल्यानंतर त्यांचा कोणताही फोटो किंवा व्हिडिओ समोर आलेला नाही. त्यांच्या दुखापतींबाबत इराणकडून अधिकृत माहितीही देण्यात आलेली नाही.दरम्यान, अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांनी १३ मार्च रोजी केलेल्या वक्तव्यात खामेनेई गंभीर जखमी असून त्यांच्या अंगभंगाची शक्यता असल्याचे म्हटले होते. अमेरिकन गुप्तचर यंत्रणेशी संबंधित एका सूत्राने त्यांचा एक पाय गमावल्याचा संशय व्यक्त केला आहे. मात्र सीआयए ने या प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode