
नवी दिल्ली, 11 एप्रिल (हिं.स.)। भारताचा स्वदेशी डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसने (यूपीआय) आपल्या स्थापनेची दहा गौरवशाली वर्षे पूर्ण करत आहे. या विशेष टप्प्यावर भारताने डिजिटल व्यवहारांच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर अभूतपूर्व यश संपादन केले आहे. सरकारी माहितीनुसार, जगातील एकूण रियल-टाइम डिजिटल ट्रान्झॅक्शनमध्ये भारताचा एकट्याचा तब्बल ४९ टक्के वाटा आहे, ज्यामुळे भारत जागतिक डिजिटल पेमेंट नकाशावर अग्रस्थानी पोहोचला आहे.
२०१६ साली नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने यूपीआयची सुरुवात केली. या प्रणालीमुळे देशातील पैसे पाठवण्याची आणि स्वीकारण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी, जलद आणि सुरक्षित झाली. मोबाईलच्या माध्यमातून काही सेकंदांत व्यवहार पूर्ण होऊ लागल्याने सामान्य नागरिकांपासून ते लहान व्यावसायिकांपर्यंत सर्वांनी यूपीआयचा मोठ्या प्रमाणावर स्वीकार केला.यूपीआय नेटवर्कच्या विस्ताराकडे पाहिल्यास त्याची झपाट्याने झालेली वाढ स्पष्ट होते. २०२१ साली २१६ बँका या प्रणालीशी जोडलेल्या होत्या, तर जानेवारी २०२६ पर्यंत हा आकडा तब्बल ६९१ बँकांपर्यंत पोहोचला आहे. यामुळे कोणत्याही बँकेचा वापरकर्ता कोणत्याही प्लॅटफॉर्मवरून सहजपणे व्यवहार करू शकतो, ही एक मोठी क्रांती ठरली आहे.
दरम्यान, यूपीआयच्या वाढीचा वेग आणि प्रमाण दोन्हीही आश्चर्यकारक आहे. केवळ जानेवारी २०२६ महिन्यात या प्लॅटफॉर्मवर २१.७० अब्ज ट्रान्झॅक्शन पार पडले असून त्यांची एकूण किंमत २८.३३ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. सध्या देशातील एकूण रिटेल डिजिटल व्यवहारांपैकी ८१ टक्के व्यवहार यूपीआयच्या माध्यमातून होत आहेत. यावरून भारतीय नागरिकांनी या प्रणालीला किती मोठ्या प्रमाणावर स्वीकारले आहे, हे स्पष्ट होते.
जागतिक स्तरावरही यूपीआयच्या यशाची दखल घेतली जात आहे. इंटरनॅशनल मॉनेटरी फंड (आयएमएफ) आणि वर्ल्ड बँक यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी भारताच्या या डिजिटल पायाभूत सुविधेचे कौतुक केले आहे. आयएमएफने यूपीआयला व्यवहारांच्या संख्येनुसार जगातील सर्वात मोठी रियल-टाइम पेमेंट सिस्टम म्हणून गौरवले आहे. केवळ एका दशकात भारताने हा संपूर्ण डिजिटल इकोसिस्टम उभारला, ही बाब विशेष उल्लेखनीय मानली जाते.
यूपीआयच्या प्रवासात सुरुवातीपासून आतापर्यंत व्यवहारांच्या संख्येत १२,००० पट वाढ झाली आहे, तर व्यवहारांच्या मूल्यामध्ये ४,००० पट वाढ नोंदवली गेली आहे. मात्र, या मोठ्या आकड्यांपेक्षा अधिक महत्त्वाची बाब म्हणजे यूपीआयचा समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत झालेला विस्तार. ग्रामीण भागातील बाजारपेठा, रस्त्यावरील विक्रेते तसेच ऑटो चालक यांच्यापर्यंतही ही सुविधा सहज पोहोचली आहे. त्यामुळे श्रीमंत-गरीब आणि शहरी-ग्रामीण असा डिजिटल दरीचा फरक मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.
भारतात विकसित झालेला हे डिजिटल पेमेंट मॉडेल आता इतर देशांसाठी आदर्श ठरत आहे. सध्या संयुक्त अरब अमिरात, सिंगापूर, फ्रान्स, मॉरिशस, भूतान, नेपाळ, श्रीलंका आणि कतार या देशांमध्येही यूपीआय सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. यामुळे परदेशात प्रवास करणाऱ्या भारतीयांना पेमेंट करणे आणि पैसे पाठवणे अधिक सोपे झाले आहे.
पेमेंटच्या पलीकडे जाऊन यूपीआय आता एक व्यापक फायनान्शियल प्लॅटफॉर्म म्हणून विकसित होत आहे. छोट्या व्यवहारांसाठी ‘यूपीआय लाईट’ आणि नियमित बिल किंवा सबस्क्रिप्शनसाठी ‘यूपीआय ऑटोपे’ यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय बँकिंग आणि फिनटेक कंपन्यांच्या माध्यमातून प्री-अप्रूव्ड क्रेडिट लाईन आणि कर्ज सुविधा देखील यूपीआयद्वारे दिल्या जात आहेत.
एकूणच, गेल्या दहा वर्षांत यूपीआयने केवळ डिजिटल व्यवहारांची पद्धत बदलली नाही, तर भारताच्या आर्थिक आणि सामाजिक संरचनेतही मोठा बदल घडवून आणला आहे. आगामी काळातही ही प्रणाली अधिक प्रगत होऊन भारताला डिजिटल अर्थव्यवस्थेत आणखी बळकटी देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule