महिलांना सभागृहांत आरक्षण देण्याचा निर्णय महात्मा फुले यांना खरे अभिवादन - मुख्यमंत्री
पुणे, 11 एप्रिल (हिं.स.) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना लोकसभा व विधानसभेत 33 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असून तो महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्त्री-शिक्षण व महिला सक्षमीकरणाच्या विचारांना अनुरूप असून त्यांना खरी आदरांजली असल्याचे
मुख्यमंत्री


पुणे, 11 एप्रिल (हिं.स.) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना लोकसभा व विधानसभेत 33 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असून तो महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्त्री-शिक्षण व महिला सक्षमीकरणाच्या विचारांना अनुरूप असून त्यांना खरी आदरांजली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांचे मुळगाव खानवडी (ता. पुरंदर) येथे पुणे जिल्हा परिषदेकडून उभारण्यात आलेल्या ‘ज्योती-सावित्री जिल्हा परिषद शाळेचे’ उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण मंत्री दादाजी भुसे, कृषि मंत्री दत्तात्रय भरणे, अल्पसंख्याक मंत्री अतुल सावे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, शिक्षण राज्यमंत्री योगेश कदम आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पैतृक गावात उभारलेली ही अत्याधुनिक शाळा म्हणजे द्विशताब्दी वर्षाची सर्वात योग्य सुरुवात आहे. सीबीएसई पॅटर्नवरील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतची ही राज्यातील पहिली जिल्हा परिषद शाळा असून ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देण्यास हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये जागतिक स्तरावर झेप घेण्याची क्षमता निर्माण होत असून काही विद्यार्थिनी इस्रो आणि नासासारख्या संस्थांपर्यंत पोहोचल्याचे त्यांनी सांगितले.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून या शाळेची उभारणी झाली असून त्यांनी शाळा उभारणीच्या प्रत्येक टप्प्यावर लक्ष घातल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी फ्रेंच व जर्मनसारख्या परकीय भाषा आत्मसात केल्या आहेत, हे बदलत्या शिक्षण व्यवस्थेचे द्योतक असल्याचे श्री. फडणवीस म्हणाले.

महात्मा फुले यांच्या नावाने कौशल्य विकासाची एक हजार केंद्रे उभारणार

पुणे जिल्हा परिषदेकडून ‘इंडस्ट्री 4.0’ अंतर्गत 100 शाळांमध्ये 100 अद्ययावत प्रयोगशाळा उभारण्यात आल्या असून शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून महात्मा फुले यांच्या नावाने कौशल्य प्रशिक्षण केंद्राची सुरुवात करण्यात आली असून भविष्यात अशी एक हजार केंद्रे उभारण्यात येतील असे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

महात्मा फुले हे दूरदृष्टीचे विचारवंत आणि थोर समाजसुधारक

महात्मा फुले हे केवळ समाजसुधारक नव्हते, तर ते प्रगतशील शेतकरी, यशस्वी उद्योजक आणि दूरदृष्टीचे विचारवंत होते. शेतीत नवनवीन प्रयोग करून शेतकऱ्यांना वर्षभर उत्पन्न मिळवून देणारे मॉडेल त्यांनी तयार केले. शेतकऱ्यांवरील अन्यायाविरुद्ध त्यांनी लढा दिला. मुंबई महानगरपालिकेची इमारत, खडकवासला धरण, येरवडा कारागृह आणि कात्रज बोगदा यांसारख्या प्रकल्पांमध्ये त्यांची दूरदृष्टी दिसून येते, असे त्यांनी नमूद केले.

स्त्री शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत त्यांनी भिडे वाड्यात देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. समाजातील अनिष्ट प्रथांविरुद्ध लढा देत विधवांचे केशवपन थांबवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढून पहिली शिवजयंती साजरी करण्याचे कार्यही महात्मा फुले यांनीच केले, असे त्यांनी सांगितले. आजचा शिक्षणाचा अधिकार कायदा ही त्याच विचारांची फलश्रुती असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत राज्य शासन ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ राबवत असून त्याअंतर्गत नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार दिले जात आहेत. ‘महाज्योती’च्या माध्यमातून ओबीसी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले असल्याचे श्री. फडणवीस म्हणाले.

मंत्री श्री. भुजबळ म्हणाले, महात्मा फुले यांच्या जन्मतिथीबाबत संशोधनातून 11 एप्रिल 1827 ही तारीख निश्चित झाली आहे. सावित्रीबाई फुले यांनी 1891 मध्ये प्रकाशित केलेल्या ‘महात्मा फुले यांचे अमर जीवन’ या ग्रंथात या तारखेचा उल्लेख असल्याचे त्यांनी सांगितले.

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे मुख्य कार्य बहुजन समाजाला शिक्षित करणे हेच होते. त्याच विचारातून खानवडी येथे उभारलेली ही आधुनिक सीबीएसई शाळा ही त्यांच्या कार्याची पुढची पायरी आहे. महात्मा फुले हे ‘नेशन बिल्डर’ होते तसेच अंधश्रद्धा आणि ब्राह्मण्यवादी प्रवृत्तींच्या विरोधात लढणारे विचारवंत होते. त्यांच्या कार्यात विविध समाजघटकांनी सहभाग घेतला होता. त्यांनी एका ब्राह्मण विधवेच्या मुलाला दत्तक घेऊन समतेचा आदर्श निर्माण केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महिलांना राजकीय आरक्षण देण्याचा निर्णय हा त्यांच्या विचारांना दिलेली खरी आदरांजली असल्याचे श्री. भुजबळ म्हणाले.

 

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande