गोरेगाव कॉन्सर्टमध्ये ड्रग्जचा कहर; ओव्हरडोसने दोन तरुणांचा मृत्यू
मुंबई, 14 एप्रिल (हिं.स.)। मुंबई शहरातील तरुणाईमध्ये वाढत्या ड्रग्ज वापराचं भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आलं असून पश्चिम उपनगरातील गोरेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टदरम्यान कथित ड्रग्ज ओव्हरडोसने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
Goregaon Concert Drugs  Overdose Two Youths Die


मुंबई, 14 एप्रिल (हिं.स.)। मुंबई शहरातील तरुणाईमध्ये वाढत्या ड्रग्ज वापराचं भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आलं असून पश्चिम उपनगरातील गोरेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टदरम्यान कथित ड्रग्ज ओव्हरडोसने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण मुंबईत मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ११ एप्रिल रोजी गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सुमारे तीन ते चार हजार तरुण-तरुणी उपस्थित होते. संगीताच्या तालावर रंगलेल्या या कार्यक्रमात मद्यपानासोबतच ड्रग्जचाही मोठ्या प्रमाणावर वापर झाल्याची माहिती समोर आली आहे. कार्यक्रमादरम्यान काही तरुण-तरुणींनी अति प्रमाणात ड्रग्ज घेतल्यामुळे त्यांची प्रकृती अचानक खालावली.

या घटनेत दोन तरुणींना तातडीने हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर एका तरुणाला गोरेगाव पश्चिम येथील लाईफ लाईन रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. उपचार सुरू असतानाच लाईफ लाईन रुग्णालयात दाखल असलेल्या तरुणाचा मृत्यू झाला. दरम्यान, ट्रॉमा केअर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर दोन्ही तरुणींना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र सोमवारी दुपारी त्यापैकी एका तरुणीचा मृत्यू झाला, तर दुसरी तरुणी अद्याप गंभीर अवस्थेत असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे. मृत विद्यार्थ्यांच्या रक्ताचे नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अहवाल अद्याप प्रलंबित आहे. या अहवालानंतर नेमक्या कोणत्या प्रकारच्या ड्रग्जचा वापर करण्यात आला होता, हे स्पष्ट होणार आहे.वनराई पोलिसांनी या घटनेत तातडीने कारवाई करत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात नेस्कोचे आयोजक सनी जैन, कार्यक्रमाशी संबंधित इव्हेंट आयोजक तसेच मृत विद्यार्थ्यांचा मित्र यांचा समावेश करण्यात आला आहे. तपास करत असून आतापर्यंत 5 जणांना अटक केली आहे. आता या सर्वांची कसून चौकशी केली जात आहे. या पार्टीत नेमके कोणते ड्रग्सचे सेवन करण्यात आले? हे ड्रग्स कुठून आणले? याबाबत सखोल चौकशी केली जाणार आहे.

दरम्यान, या घटनेमुळे शहरातील लाईव्ह इव्हेंट्समधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या अशा कार्यक्रमांमध्ये ड्रग्जचा मुक्त वापर रोखण्यासाठी आयोजक आणि प्रशासनाने अधिक कडक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. तसेच तरुणांमध्ये वाढत्या व्यसनाधीनतेबाबतही गंभीर चिंता व्यक्त होत असून, अशा घटना रोखण्यासाठी केवळ पोलीस कारवाई पुरेशी नसून सामाजिक पातळीवर व्यापक जनजागृती निर्माण करणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande