
त्र्यंबकेश्वर, 14 एप्रिल (हिं.स.) : त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग मंदिरात ‘व्हीआयपी दर्शन’ाच्या नावाखाली भाविकांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी त्र्यंबक पोलिसांनी मोठी कारवाई करत मंदिर संस्थानचा विश्वस्त पुरुषोत्तम कडलग याला अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंदिरात जलद दर्शन मिळवून देण्याचे आमिष दाखवून भाविकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. 11 एप्रिल रोजी नाशिकच्या पंचवटी परिसरातील काही भाविक दर्शनासाठी त्र्यंबकेश्वर येथे आले होते. त्यांनी अधिकृत 200 रुपयांचा देणगी पास घेतला होता. मात्र, रांगेत उभे असताना आरोपी पुरुषोत्तम कडलग याने त्यांना संपर्क साधून “4 ते 5 तासांची प्रतीक्षा टाळून 10 मिनिटांत दर्शन घडवून देतो” असे सांगत पैशांची मागणी केली.
त्याने एका भाविकाकडून 3 हजार रुपये, तर इतर दोन भाविकांकडून प्रत्येकी 2 हजार रुपये रोख घेतल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी एका भाविकाने त्र्यंबक पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.
या प्रकरणात सुरुवातीला गोटीराम मनाजी पेहरे आणि अभिषेक कडलग (पुरुषोत्तम कडलगचा पुतण्या) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गोटीरामला तात्काळ अटक करण्यात आली असून अभिषेक कडलग सध्या फरार आहे.
तपासादरम्यान या संपूर्ण रॅकेटमध्ये विश्वस्त पुरुषोत्तम कडलग याचा सहभाग असल्याचे उघड झाले. त्यानंतर सोमवारी रात्री उशिरा पोलिसांनी त्याला अटक केली.
त्र्यंबकेश्वर येथे देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक येतात. अधिकृतरीत्या 200 रुपयांमध्ये ‘व्हीआयपी दर्शन’ सुविधा उपलब्ध असताना काही एजंटमार्फत 3 हजार ते 12 हजार रुपये आकारले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मंदिर समितीच्या अध्यक्ष आणि न्यायाधीश यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV