
मुंबई, 14 एप्रिल (हिं.स.)। युवावर्गाची ऊर्जा, बिनधास्त अटिट्यूड आणि भन्नाट लय यांचा परफेक्ट संगम असलेलं ‘कारट्या’ गाणं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. वर्किंग आय फिल्म्स प्रस्तुत ‘बाप्या’ या आगामी चित्रपटातील हे नवं रॅप गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून, अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. विशेषतः तरुणांमध्ये या गाण्याची क्रेझ झपाट्याने वाढताना पाहायला मिळतेय.
या गाण्याच रॅपसोबतच आणखी एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे, त्याची अफलातून दृश्य मांडणी. आजवर अनेक रॅप गाणी आली असली तरी ‘कारट्या’ हे गाणं आपल्या वेगळ्या चित्रणशैलीमुळे ठळकपणे उठून दिसतेय. या गाण्याचं चित्रीकरण एक्स्ट्रा वाइड डायनॅमिक कॅमेरा लेन्सिंगमध्ये करण्यात आलं असून, मोठ्या पडद्यावर पाहाताना हा अनुभव अक्षरशः भव्य वाटेल. विशेष म्हणजे, या गाण्यासाठी पहिल्यांदाच इंस्टा ३६० कॅमेऱ्याचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे प्रत्येक फ्रेममध्ये वेगळेपणा आणि नवी ऊर्जा जाणवते.
समुद्रकिनाऱ्यावर चित्रीत केलेली रंगतदार दृश्यं, सतत बदलणारे अँगल्स, विस्तृत फ्रेम्स आणि अनोख्या कॅमेरा हालचालींमुळे ‘कारट्या’ हे गाणं मोठ्या पडद्यावर एक भन्नाट अनुभव ठरतो. प्रेक्षकांना जणू त्या क्षणांचा भाग असल्याची जाणीव करून देणारी ही सिनेमॅटिक मांडणी आजच्या तरुणांच्या दृष्टीकोनाशी थेट जोडली गेली आहे.
आजच्या तरुणाईचा जगाकडे पाहाण्याचा दृष्टिकोन हा पारंपरिक चौकटींपेक्षा खूप वेगळा आणि मोकळा आहे. जिथे मोठ्यांची विचारसरणी अनेकदा मर्यादित आणि एका ठराविक चौकटीत अडकलेली असते, तिथे तरुणांचं जगाकडे पाहाणं अधिक व्यापक, निर्बंधमुक्त आणि शोध घेणारं असतं. ‘कारट्या’ हे गाणं हाच अतिविस्तृत दृष्टीकोन अत्यंत प्रभावीपणे मांडतं. रॅप हा मुळात वैयक्तिक, भावना व्यक्त करण्याचा प्रकार आहे. ‘कारट्या’मध्येही हीच ऊर्जा दिसते, पण ती केवळ शब्दांत नाही तर प्रत्येक फ्रेममध्ये, प्रत्येक कॅमेरा अँगलमध्ये जिवंत होते. त्यामुळे हे गाणं फक्त ऐकण्यापेक्षा अनुभवण्यासारखं बनतं.
या गाण्याला गायक पल्लवी परांजपे आणि अभिजीत चंद्रकला यांच्या दमदार आवाजाची साथ लाभली आहे. अभिजीत चंद्रकला यांनीच या गाण्याला तुफान ऊर्जा देणारं संगीत दिलं असून, गीतकार शौनक नारळे (असर) यांनी तरुणांच्या भावना अचूक शब्दांत पकडत गाण्याला खास ओळख दिली आहे.
समीर तिवारी दिग्दर्शित ‘बाप्या’ या चित्रपटाची निर्मिती मुत्कल तिवारी आणि समीर तिवारी यांनी केली आहे. युवावर्गाच्या उर्जेने आणि वेगळ्या दृश्यशैलीने भरलेलं ‘कारट्या’ गाणं आधीच चर्चेत आलं असून, आता येत्या १५ मे २०२६ रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘बाप्या’ चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता आणखीच वाढली आहे.
LINK : https://youtu.be/9WzmRGCcIvc
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर