
अमरावती, 15 एप्रिल, (हिं.स.) - अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करून त्यांचे अश्लील फोटो व व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित केल्याच्या प्रकरणात अचलपूर येथील आरोपी अयाज अहमद याच्या घरावर आज ‘बुलडोजर’ कारवाई करण्यात आली. त्याच्या घराचा काही भाग अतिक्रमित असल्याने नगर परिषदेने घराचा जीना तोडून टाकला. या कारवाईदरम्यान प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला हेाता. लोकांनीही गर्दी केली होती.
अचलपूर नगर परिषदेचे पथक बुलडोजर घेऊन आरोपीच्या घरासमोर पोहचले. जेसीबीच्या माध्यमातून घराच्या बाजुला लावण्यात आलेला लोखंडी जिना तोडण्यात आला. कारवाई दरम्यान भाजपचे आमदार प्रवीण तायडे स्वत: हजर होते. कारवाईदरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता आणि नागरिकांची देखील मोठी गर्दी झाली होती. अशा प्रकारे बुलडोजरच्या सहाय्याने कारवाई करण्याची अचलपूरमधील पहिलीच घटना असल्याचे सांगण्यात येत आहे.
अचलपूर नगरपरिषदेकडून संबंधित घरावरील अतिक्रमणाबाबत तपास केल्यानंतर, काही भाग बेकायदेशीररित्या बांधण्यात आल्याचे समोर आले होते. त्यानंतर नगरपरिषदेने आरोपीच्या कुटुंबाला अतिक्रमणासंदर्भात नोटीस बजावल्याची माहिती समोर आली होती. त्यानुसार आज बुलडोझरद्वारे कारवाई करण्यात आली. दरम्यान, या कारवाईच्या पार्श्वभूमीवर आरोपीच्या घराजवळ पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता, जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये.
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करून त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याच्या गंभीर प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ आज अचलपूर-परतवाडा शहरातील बाजारपेठ पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय सर्वपक्षीय तसेच विविध सामाजिक संघटनांनी घेतला आहे.या बंदला आज १०० टक्के प्रतिसाद नागरिकांनी दिला .
या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. शहरातील व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनांनी एकत्र येत निषेध व्यक्त केला.
दरम्यान, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासन सतर्क झाले असून संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी सर्वसामान्यांची भावना असून या प्रकरणाचा तपास जलदगतीने पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी