
पुणे, 17 एप्रिल (हिं.स.)। सत्ताधारी भाजपची नावे निश्चित होत नसल्याने रखडलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांची निवड येत्या सोमवारी (२० एप्रिल) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत केली जाण्याची शक्यता आहे. सत्ताधारी भाजपच्या नेत्यांमध्ये अखेर एकमत झाल्याने सात जणांची नावे निश्चित झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
पुणे महापालिकेतील भाजपच्या स्वीकृत नगरसेवकांची नावे नऊ मार्चला जाहीर झाली. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपमधील स्थानिक नेत्यांमध्ये एकमत होत नसल्याने स्वीकृत नगरसेवकांचा तिढा वाढला होता. त्यात जुने विरुद्ध नवे, आमदारसमर्थक विरुद्ध निष्ठावंत असा संघर्ष सुरू होता. भाजपमध्ये आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, अमित गोरखे, उमा खापरे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे असे प्रमुख गट आहेत. त्यांनी आपापल्या समर्थकांची नावे सुचवली होती. भाजपमधील एका गटाने ज्येष्ठ, निष्ठावंतांची काही नावे सुचवली आहेत. माजी नगरसेवकही इच्छुक आहेत. त्यामुळे कोणाला संधी द्यायची याबाबत एकमत झाले नाही. परिणामी, नावाची निवड लांबणीवर पडली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु