
जळगाव , 15 एप्रिल (हिं.स.) | सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार सुरू असतानाच आता पुन्हा एकदा भाववाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मध्यंतरी सोन्याचे दर १ लाख ४० हजारांवर आले होते. मात्र आता सोन्याचे दर पुन्हा वाढीच्या मार्गावर असल्याने ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. जळगावातील सराफा बाजारात सोने-चांदीच्या दराने पुन्हा उसळी घेतली असून गेल्या २४ तासांत सोन्याच्या दरात २ हजार रुपयांची वाढ, तर चांदीच्या दरात सुमारे ४ हजार रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. त्यामुळे लग्नसराईच्या काळात सोने खरेदी करावे की थांबावे, असा प्रश्न अनेक खरेदीदारांसमोर उभा राहिला आहे.
आजचे सोन्याचे दर जीएसटीसह १ लाख ५७ हजार ५९० रुपयांवर पोहचले आहेत. तर चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलोमागे २ लाख ६३ हजार ६८० रुपयांवर पोहचले आहेत.येत्या १९ एप्रिल रोजी ‘अक्षय्य तृतीया’ आहे. या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करण्याची परंपरा आहे. मात्र, सध्याचे गगनाला भिडलेले भाव पाहता, यंदा ग्राहक सोने खरेदीकडे पाठ फिरवतील की काय, अशी भीती व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. १ लाख ५७ हजारांचा भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याचे चित्र आहे.अमेरिका आणि इराण यांच्यातील संभाव्य चर्चांमुळे जागतिक बाजारपेठेत अस्थिरता आहे. अमेरिकेतील आर्थिक परिस्थिती, डॉलरच्या मूल्यातील चढ-उतार तसेच सणासुदीच्या काळात वाढलेली मागणी यामुळे सोने-चांदीच्या दरात वाढ होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर