
सोलापूर, 17 एप्रिल (हिं.स.) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी 19 एप्रिल रोजी आयोजित मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महापालिकेने तयारीला वेग दिला आहे. आज मिरवणूक मार्गाची सविस्तर पाहणी करण्यात आली असून विविध यंत्रणांनी समन्वय साधत आवश्यक उपाययोजना सुरू केल्या आहेत.
या पाहणी दौऱ्यात महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, पोलीस आयुक्त एम. राजकुमार तसेच महापालिका व पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी रस्त्यांची दुरुस्ती, झाडांच्या फांद्यांची छाटणी, तसेच विद्युत दिव्यांची देखभाल यांसारख्या कामांना तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
महापौर कोंड्याल यांनी मिरवणूक मार्ग स्वच्छ, सुरक्षित आणि सुरळीत राहण्यासाठी सर्व विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांनीही शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, पोलीस आयुक्त राजकुमार यांनी सांगितले की, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले असून आवश्यकतेनुसार वाहतूक वळविण्यात येईल. मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एकूणच, प्रशासनाकडून व्यापक तयारी करण्यात येत आहे.---------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड